सावकारी पैसा-व्याजाच्या कारणावरून कोयत्याने वार; कर्जदाराच्या घरात घुसून चौघांचा धुडगुस

shivrajya patra
सोलापूर : व्याजाच्या पैशाच्या कारणावरून सावकारासह चौघांनी कोयता-हॉकी स्टिकने कर्जदारास जबर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना देगाव रस्त्यावरील श्रीराम नगरात बुधवारी रात्री घडली. कोयत्याच्या वाराने जखमी नवनाथ मानसिंग चव्हाण (वय-३८ वर्षे) याच्या डोकीस दुखापत झाली असल्याचं सांगण्यात आलंय.

देगाव रस्त्यावरील बसवेश्वर नगर श्रीराम नगरातील रहिवासी नवनाथ चव्हाण याच्या घरात घुसलेल्या दोन अनोळखी तरुणांनी, तु तेलंगे यांचे पैसे देतो का नाही, असे म्हणून लाथाबुक्यांने मारहाण करण्यास सुरूवात केली. 

त्यावेळी त्यांच्या पाठोपाठ आलेल्या धनंजय जगन्नाथ तेलंगे आणि महेश तेलंगे भावांपैकी धनंजय याने 'व्याजाचे पैसे देतो का नाही, धरा रे याला ' असे बोलून हातात आणलेल्या कोयत्याने नवनाथ चव्हाण यांच्या डोकीत वार केला, तो वार डोक्यात लागल्याने नवनाथ खाली पडला, तेव्हा त्या चौकडीनं नवनाथला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान तू पैसे दिले नाही तर तुला खल्लास करतो, अशी धमकी धनंजय देत होता.

त्यावेळी धनंजय तेलंगे व त्याचा भाऊ महेश यांनी त्यांच्या हातातील हॉकीस्टिकने नवनाथच्या हातावर, पाठीवर, नाकावर मारले. त्यामध्ये त्याच्या हाताला व नाकाला दुखापत झाली. जखमी नवनाथची पत्नी भांडण सोडवण्यासाठी आली असता, तिला देखील त्यांनी सर्वानी मिळून हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण करीत त्याच्या घरातील गृहपयोगी साहित्याची तोडफोड केली.

याप्रसंगी नवनाथ चव्हाण आणि त्याच्या पत्नीने आरडाओरडा केल्याने ते सर्वजण घटनास्थळावरून पळून गेले. याप्रकरणी जखमीच्या फिर्यादीनुसार सलगर वस्ती पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस उपनिरीक्षक कुतवळ या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

To Top