रमजानुल मुबारक - २९ शुक्रिया .. शुक्रिया .. अलविदा .. जे मिळालं ते जतन करा

shivrajya patra

 
वित्र रमजान महिन्याची आज किंवा उद्या सांगता होणार आहे. आज चंद्रदर्शन झाल्यास उद्या ईद साजरी होईल. आज चंद्रदर्शन न झाल्यास उद्याचा रोजा पूर्ण करून परवा ईद साजरी करण्यात येईल. याबाबत हजरत पैगंबरांनी म्हटले आहे कि, चंद्र पाहून रोजे धरा व चंद्र पाहूनच ईद साजरी करा. चंद्रदर्शन याबाबत दर वर्षी थोडा-फार गोंधळ होतो. त्याचे मुख्य कारण म्हणजे मीडिया. येथे चंद्र दिसला, तेथे चंद्र दिसला, इथून खबर आली, तिथून खबर आली, अशा चर्चा होतात. त्यामुळे सर्वसामान्य लोक संभ्रमित होतात.

सौदी अरेबिया सरकार मध्ये इस्लामी पंचांग वर्षाच्या अनुषंगाने एक विशेष विभाग कार्यरत आहे. त्यामध्ये खगोल शास्त्रज्ञांचा समावेश असून ते दर महिन्याला चंद्र दर्शनाची माहिती घेतात आणि त्यानुसार घोषणा करतात. सौदी अरेबिया सरकारचे सुप्रीम कोर्टाचे जज हे त्या कमिटीचे अध्यक्ष आहेत. समितीच्या अहवालानुसार चंद्र दर्शनाचा निर्णय जाहीर केला जातो.

आपल्याकडे या संदर्भात  हिलाल कमिटी अस्तित्वात आहेत. हिलाल म्हणजे पहिल्या तारखेचा चंद्र. योग्य ती शहानिशा करुन ते निर्णय घेतात. सर्वसाधारणपणे दोनशे किलोमीटरच्या आत चंद्रदर्शन झाले तर त्या परिसरात ईद साजरी केली जाते. आता मीडियामुळे जग खूप जवळ आले आहे. त्यामुळे जगात कुठे काय घडले हे लगेच कळते.

यावर्षीचा रमजान महिना तीव्र उन्हामध्ये गेला. उष्णतेच्या लाटा देखील आल्या. परंतु ज्यांनी आपल्या मनामध्ये रमजानचे रोजे धरण्याची खूणगाठ बांधली होती, म्हणजेच मनामध्ये निश्चय केला होता, त्यांना अल्लाहने बळ दिले. त्यांनी रोजे पूर्ण केले.अगदी नऊ दहा वर्षाच्या मुला-मुलींनी देखील महिनाभराचे रोजे पूर्ण केल्याचे दिसून येत आहे.

ज्यावेळी रमजान महिना सुरू होतो, त्यावेळी अनेकांना प्रश्न पडतो कि, हा महिना कसा जाईल आणि आता हा प्रश्न पडला आहे कि हा महिना कसा गेला ? त्याचे कारण म्हणजे मनाचा निश्चय (दिल का इरादा) ही एक महत्त्वपूर्ण बाब आहे.

एखादे कार्य करण्यासाठी आपण निश्चय केला कि, त्यापासून दूर जायचं नसतं. केलं जाणारं कार्य हे अल्लाहची मर्जी संपादन करण्यासाठी असावं. आपल्या मर्जी साठी नाही. आपण आपल्या मर्जीने जीवन जगायचा प्रयत्न करतोय आणि म्हणून वेगवेगळ्या संकटांना आपल्याला सामोरे जावे लागते. वैज्ञानिक प्रगती वाईट नाही. परंतु तिचा दुरुपयोग अत्यंत वाईट आहे. गर्भलिंग निदान चाचणी करून मुलीचा गर्भ पाडून टाकणे, ही गोष्ट अल्लाह ला नापसंत आहे. कारण या गोष्टीचे दुष्परिणाम फार वाईट आहेत.

आपण पाहतोय कि गर्भलिंग निदान चाचणीमुळे मुलींना गर्भात मारण्याचे प्रमाण एवढे वाढले कि, आता सरकारला कायदा करून गर्भलिंग निदान चाचणीवर बंदी घालावी लागली. त्यामुळे मुलींची संख्या कमी व्हायला लागली. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. निसर्गाचे सर्व नियम हे आपल्या हितासाठीच आहेत. मात्र ते समजून न घेतल्याने आपल्याला चुकीचे वाटतात.

इस्लामी संस्कृती आणि इस्लामी कायदे ज्यांनी समजून घेतले ते कधीच त्यांना नाव ठेवणार नाहीत. परंतु अर्धवट माहितीच्या आधारे मते व्यक्त करून बौद्धिक दिवाळखोरी जाहीर करण्यापेक्षा त्या बाबी मागील सत्य जर आपण जाणून घेतले तर ते आपल्या सर्वांच्या हिताचे असते.

आज सायंकाळी चंद्र दर्शनानंतर पवित्र रमजान महिन्याची सांगता होणार आहे. एक महिना कसा निघून गेला ते कळले देखील नाही. जगाच्या विनाशाची जी कारणे कुरआनमध्ये दर्शविली आहेत. त्यामधील एक प्रमुख कारण आहे, दिवसांची बरकत निघून जाईल.

हजरत पैगंबर साहेबांनी याबाबत असे नमूद केले आहे कि, ज्यावेळी जगाचा विनाश जवळ येईल, त्यावेळी वर्ष महिन्यासारखे, महिने आठवड्यासारखे, आठवडे दिवसासारखे, दिवस तासासारखे आणि तास मिनिटांसारखे निघून जातील. आज आपण अनुभवतोय कि, दिवस भराभर निघून जात आहेत. नवीन वर्ष सुरू होऊन तीन महिने झाले, यावर विश्वास देखील बसत नाही. जीवनाचा एक एक दिवस कमी होत असताना आपण मात्र वाढदिवस साजरे करतो यापेक्षा वेगळे दुर्दैव नाही.

रमजान महिना ही त्याला अपवाद नाही. ईश्वरी कृपेने ज्यांनी मनाचा ठाम निश्चय केला होता, त्यांचे सर्व रोजचे पूर्ण झाले. तरावीह देखील पूर्ण झाली. एकदा पक्का निश्चय केला कि, परमेश्वर सुद्धा मदत करतो याचा प्रत्यय यानिमित्ताने अनेकांनी घेतला. जुजबी कारण सांगून अनेकांनी टाळले देखील. परंतु हे विधिलिखित आहे.

एखाद्याचं मन प्रार्थनेमध्ये करमत नसेल तर याचा अर्थ असा नाही कि तो भक्त नाही. याचा अर्थ असा आहे कि देवाला त्याच्या प्रार्थनेची आवश्यकता नाही. कधी -कधी धार्मिक संस्कारामध्ये मन रमत नाही. इतर गोष्टींकडे मात्र जास्त प्रमाणात रमत असतं.परमेश्वर हा आपल्या प्रार्थनेसाठी आतुर नाही. आपण आपल्या मनाने त्याची करुणा भाकली पाहिजे. त्याचे हजारो फरिश्ते चोविस तास त्याचे नामस्मरण करीत आहेत. आपल्या प्रार्थनेची त्याला आवश्यकताच नाही.हे सर्व आपण आपल्यासाठी करायचे आहे.

ज्यांनी पूर्ण महिन्याचे पालन केले, त्यांना हा खरा ईदचा आनंद मिळणार आहे. अशा सर्वांचे अभिनंदन. गेली अठ्ठावीस वर्ष आणि मागील महिनाभर या लेखमालेचे दैनिक 'लोक आवाज' च्या वाचकांनी अत्यंत आपुलकीने स्वागत केले. नेहमीप्रमाणे उत्तम प्रतिसाद दिला. बहुमोल प्रतिक्रिया दिल्या. त्या सर्वांना धन्यवाद.

रमजान महिन्याची सांगता होताना अल्लाहची रहमत, बरकत आपल्या सर्वांवर व आपल्या देशावर सतत होत राहो, हीच अल्लाहकडे प्रार्थना. मनापासून आभार. शुक्रिया .. शुक्रिया .. अलविदा .. अलविदा ...
(क्रमशः)

सलीमखान पठाण-9226408082.

To Top