रमजान महिन्याची वाटचाल आता शेवटाकडे सुरू झाली आहे. ईदची तयारी जोरात सुरु झाली आहे. शेवटच्या टप्प्यात झकात, सदका, फित्रा यांचे वितरण करण्यामध्ये सर्व जण व्यस्त आहेत. गरजूंना शोधून मदत केली जात आहे. अल्लाह आणि त्याचे पैगंबर हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सांगितलेल्या मार्गानुसार प्रत्येक जण आचरण करण्याचा प्रयत्न करीत आहे. ईदचा आनंद सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत.
मानवता काय असते याची प्रचिती रमजान महिन्यामध्ये अनेकांना आली आहे. मदत करण्यासाठी प्रत्येक जण पुढे येत आहे. गरजूंना मदत करून त्यांच्या गरजा भागवताना आपल्या पदरात पुण्य कसे प्राप्त होईल, याचा प्रत्येक जण विचार करत आहे. आपल्याला प्राप्त बळाचा किंवा अधिकाराचा दुरुपयोग करू नये, अशी महत्त्वाची शिकवण कुरआन शरीफ मध्ये दिली गेली आहे.
जागा बळकावणे, संपत्ती हडप करणे, अधिकार ग्रहण करणे या बाबींना इस्लाममध्ये कोणताही थारा नाही. वीतभर जागा जरी आपण कोणाची बळकावली तर कयामतच्या दिवशी त्याचा मोठा जाब आपल्याला द्यावा लागेल, हे प्रत्येकाने ध्यानात घेतले पाहिजे. 'जगा आणि जगू द्या' या सूत्राचा अवलंब करूनच प्रत्येकाने आपले जीवन व्यतीत केले पाहिजे.
थोडेसे अधिकार मिळाल्यानंतर त्याचा सदुपयोग करण्याऐवजी दुरुपयोग करण्याकडे जास्त कल असतो. परंतु ते अधिकार अल्पकालिक असतात ही जाणीव ठेवून जर आपण वागलो तर पायउतार झाल्यानंतर देखील लोक आपल्याशी प्रेमाने वागतात, असा सर्वसाधारण लोकांचा अनुभव आहे. आपल्याला जे काही करावयाचे आहे ते चांगलेच करावे,कुणाला तरी खाली दाखवण्यासाठी अधिकारांचा दुरुपयोग करणे योग्य नाही.
जीवन कसे जगावे याचे चिंतन करण्यासाठी कुरआन शरीफ वाचला पाहिजे. तो समजून घेतला पाहिजे आणि त्यामध्ये अभिप्रेत आहे, त्याप्रमाणे आपले आचरण केले पाहिजे. तरच आपण यशस्वी होणार आहोत.
जगातील अनेक चालीरिती इस्लामला मान्य नाहीत.इस्लाम धर्मामध्ये मद्यपान करणे निषिद्ध मानले गेले आहे. इस्लामपूर्व काळामध्ये सर्वजण मद्यपान करीत होते. मात्र त्याचे होणारे दुष्परिणाम पाहून साक्षात अल्लाहने मद्यपानाला प्रतिबंध लावला. त्यामुळे एका वाईट गोष्टीला मनाई करण्यात आली. आपण पाहतो या दारुच्या व्यसनापायी अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत तर अनेक लोक देशोधडीला लागले आहेत. अनेकांची प्रतिष्ठा धुळीस मिळून समाजामध्ये आपली इज्जत राहत नाही.एका वाईट सवयीमुळे संपूर्ण जीवन बेचिराख होते. म्हणूनच त्यावर धार्मिकदृष्ट्या बंदी घालण्यात आली आहे.
अशा इतर अनेक गोष्टी आहेत कि, ज्या इस्लामने अमान्य करून त्यावर बंदी लावली आहे, परंतु ते समजून न घेता त्यावर भाष्य केले जाते हे दुर्दैवी आहे. चांगल्या गोष्टींचा स्वीकार आणि वाईट गोष्टींचा तिरस्कार हे सूत्र जर आपण अवलंबले तर नक्कीच आपले जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही.
या दुनियेत चांगली माणसं गप्प असल्यामुळे वाईट कृत्य करणाऱ्यांचे फावते. मात्र मनगटशाहीच्या बळावर कोणी अन्याय करू पाहत असेल तर त्याला न्याय द्यायचे काम ईश्वर करीत असतो हे विसरता कामा नये.त्याचा न्याय अंतिम असतो. एखादा प्रसंग घडल्यास आपण न्याय निवाडा न करता तू ईश्वरावर सोपवला तर निश्चितपणे आपल्या मनाला समाधान होईल असं तोडगा तेथून मिळतो. (क्रमशः)
सलीमखान पठाण - 9226408082.