बहुतांश लोक रमजान महिन्यातच जकात द्यावी असे समजतात, मात्र तसे नाही. तुमच्या नफ्याच्या मालाला जेव्हा एक वर्ष पूर्ण होईल, तेव्हा जकात दिली पाहिजे. रमजान महिन्यात मिळणारे जास्त पुण्य प्राप्त व्हावे, या हेतूने जकात या महिन्यात देण्याकडे कल जास्त असतो.
समाजातील सर्व घटकांचा विकास व्हावा. कुणी गरीब राहू नये, असेल तर त्याच्याही गरजा पूर्ण व्हाव्यात, या हेतूने हजरत पैगंबरांनी जकातीची ही व्यवस्था निर्माण केली. समाजातील अगदी शेवटचा घटक देखील वंचित राहू नये, हा या मागचा मुख्य उद्देश आहे.
समाजातून गरीबीचे उच्चाटन करणे, हा देखील हेतू आहे. तसेच समाजातील वृध्द, विधवा,अनाथ यांचे पालनपोषण करणे, गंभीर आजारी रुग्णांना मदत करणे, शिक्षणासाठी हातभार लावणे, हा आहे. जकात अदा केल्याने आपल्या व्यापार उदिमात वाढ होते. बरकत येते.
जे व्यापारी किंवा इतर व्यावसायिक वर्षभराच्या आपल्या व्यापार, व्यवसायाचा काटेकोरपणे हिशोब करुन योग्य ती जकात अदा करतात त्यांची भरभराट झालेली पहावयास मिळते तर जे याबाबत कुचराई करतात, त्यांना तोटा सहन करावा लागत असल्याची अनेक उदाहरणे समाजात पहावयास मिळतात.
आपल्याकडे प्रामुख्याने धार्मिक पाठशाळा (मदरसा) ना जकातीची रक्कम मोठ्या प्रमाणावर दिली जाते. या रकमेतून मदरसात शिकणाऱ्या मुला-मुलींचा जेवण, कपडे व राहण्याचा खर्च भागविला जातो.
अलिकडच्या काळात शिक्षणासाठी ही या रकमेचा सदुपयोग केला जात आहे. गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा खर्च जकात च्या रकमेतून केला जात आहे. अनेक सामाजिक संस्था व व्यक्ती याबाबत अग्रेसर आहेत. जकात देतांना ती देण्याचे जाहीर प्रदर्शन टाळावे, घेणाऱ्याला कमीपणा वाटणार नाही, अशा पध्दतीने द्यावी. गरजूंचा शोध घेऊन शक्य तो गुप्तपणे त्यांची मदत करावी. ही मदत अल्लाहच्या मर्जीसाठी दिली जात असल्याने तोच याचा मोबदला आपल्याला देईल, ही श्रध्दा त्यामागे असावी. (क्रमशः)
सलीमखान पठाण-9226408082.