कोकणातील राजापूर येथील घटना मनात चीड येण्यापेक्षा उद्विग्स करणारी तितकीच मनाला यातना देणारी आहे. कोकण भूमीचा लौकिक सामाजिक, धार्मिक सद्भाव जपणारी भूमी असा आहे. अशा परिस्थितीत राजपुरातील घटनेने मनाला अतीव दुःख झाले. कोकणातील शिमगोत्सव हा जसा एक धार्मिक उत्सव आहे, तितकाच त्याचे सांस्कृतिक महत्व ही आहे.
खूप आगळा-वेगळा असा हा महोत्सव कोकणी बांधव शेकडो वर्ष साजरा करत आले आहेत. या शिमगोत्सवाचे सगळ्यात आगळे-वेगळे महत्व म्हणजे देव भक्तांच्या भेटीला त्याच्या दारात येतो आणि मला वाटत नाही की, अशी ही आगळी वेगळी परंपरा देशात कोठे पहायला मिळत असेल आणि आणखी एक महत्व या ग्रामदेवतांच आहे.
अपवाद वगळता बहुसंख्य ग्रामदेवता या स्त्री रूपात आहेत आणि यातुन स्त्रिशक्तिच महत्वही विषद होते. अशा या दैदिप्यमान सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सवात राजापूर सारख्या एरवी शांत आणि सर्वधर्मीयांचे एकमेकांशी सौहार्दाचे संबंध असणाऱ्या शहरात घडलेली घटना ही केवळ राजापूरच नव्हे तर संपूर्ण कोकणच्या ऐतिहासिक वारशाला आणि लौकिकाला गालबोट लावणारी आहे.
या घटनेमध्ये कोण चूक कोण बरोबर याचा शब्दच्छल मी करणार नाही. मी फक्त या घटनेचा संदर्भ घेऊन सर्वांना इतकंच आवाहन करेन की, या भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभला आहे आणि या भुमितच महाराजांनी आपली राजधानी वसवली.
सर्व जाती-धर्माच्या मावळ्यांना घेऊन शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधलं. तर या थोर वारशाचे जतन करताना, आपण सर्वांनी तारतम्य बाळगणे आवश्यक आहे. हिंदु समाजाने काय करावे, मुस्लिम समाजाने काय करावे, असं सांगून मी कुठल्याही समूहाला उपदेशाचे डोस पाजू इच्छित नाही.
मुळातच आपण सर्वांनी ते आणि आपण या वर्गीकरणातून बाहेर पडणे आवश्यक आहे, कारण आपण सारे एकच आहोत आणि एका समृद्ध वारशाचे पाईक आहोत. माझे आपणा सर्वाना नम्र निवेदन आहे की, सर्व जाती-धर्माच्या धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांचा एकमेकांनी आदर करूया आणि देशभर एकूणच जे भयाचे वातावरण आणि धार्मिक विद्वेष पसरवला जातोय, त्या वातावरणात एक सौहार्दाचा, सदभावनेचा, प्रेम आणि आपुलकीचा आदर्श देशासमोर ठेवू या.
मी राजापुरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कार्यकर्ते आणि धुरिणांना विनंती करेन की, त्यांनी एकत्रित बसून कोकणच्या प्रतिमेला तडा देणाऱ्या प्रवृतींना वेळीच आवर घालावा व राजापूर तसेच कोकणचे असणारे सौहार्द आणि सर्वधर्मसमभावाचे महात्म्य अबाधित राखावे.
मी या ठिकाणी अभिमानाने नमुद करेन की, कालच माझ्या गावची ग्रामदेवता श्री देवी महालक्ष्मीच्या शिमगोत्सवाला सुरुवात झाली आणि कितीतरी वर्षाच्या प्रथा परंपरेनुसार देवीची पालखी प्रथम माझ्या दलवाई मोहल्ल्यात आली. माझे आजोळ असणाऱ्या गोवळकोट जेथे शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक गडकोट किल्लाही आहे, येथील करंजेश्वरी देवीच्या उत्सवाची सुरुवातच मुळी मुस्लिम धर्मीय चौगुले कुटुंबीयांच्या घरापासून होते. किती तरी गावातून अशा प्रथा परंपरा आजही पाळल्या जातात.
आपल्या एकमेकांच्या धार्मिक सलोख्याच्या, ऋणानुबंधाच्या गाठी अधिक घट्ट कशा होतील हे आपण सर्वांनी पाहिले पाहिजे आणि शिमगोत्सवासारखा उत्सव हा हे बंध वृद्धिंगत करण्याचा एक मार्ग आहे. मला वाटत नाही की देव भक्तांच्या भेटीला येत असताना कोणी सच्चा भक्त काही आगळीक करेल आणि कोणी करायचे ठरवले तरीही कोकणातील या सुंदर परंपरेवर एक साधा ओरखडा तरी उमटेल.
मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजानचा महिना ही सुरू आहे. हिंदु असो मुस्लिम असो सर्वच आज भक्तिरसात लीन आहेत. आपल्या उत्साहाला संयमाची आणि श्रद्धेला विवेकाची जोड दिली तर अशा घटनांची पुनरावृत्ती टाळता येईल. आज हिंदु मुस्लिम बांधवांचा प्रमुख सण एकाच वेळी आपण साजरा करीत आहोत आणि हीच आपली, इथल्या संस्कृतीची सर्वसमावेशकता आहे आणि आपल्या पूर्वजांनी आपल्याला हा जो सुंदर आणि समृद्ध वारसा दिला आहे त्याचे आपण जतन आणि संवर्धन करूया.
मी सर्वांना विनम्र आवाहन करेन की, खास करून इतर ठिकाणचे जे लोक निरनिराळ्या माध्यमातून या विषयावर नकारात्मक व टीकात्मक संदेश प्रसारित करत आहेत, त्यांनी हे सर्व प्रकार थांबवावेत आणि सौहार्दाची प्रक्रिया कशी गतिमान होईल, इकडे लक्ष द्यावे. आपणा सर्वाना शिमगोत्सवाच्या तसेच पवित्र रमजानच्या शुभेच्छा देतो आणि राजापूर येथे जे काही घडलं ते मळभ लवकरच दूर होऊन पुन्हा आपण सर्व एकमेकांच्या सण उत्सवात आनंदाने सहभागी होऊ या, अशा सद्भावना व्यक्त करतो.
हुसेन दलवाई
माजी मंत्री तथा माजी खासदार
(शेअरींग : Nisarali24x7 अमन ग्रुप)