रमजानुल मुबारक - ८ कष्टातूनच मिळतो खरा आनंद

shivrajya patra
रमजान महिन्याचे पालन करतांना या वर्षी उन्हाळ्याचा सामना करावा लागत आहे. ३६ डिग्रीच्या तीव्र उन्हात सर्वजण पाणी पाणी करीत असतांना अल्लाहच्या प्रति श्रध्दा बाळगणारा खरा भक्त कितीही तीव्र उन असले तरी पाण्याकडे पाहत सुध्दा नाही. त्याची श्रध्दा व भक्ति ही त्याला त्याच्या निश्चित ध्येयापर्यंत नेण्यास कटिबध्द असते. 

या वर्षी रमजान महिना हा मार्च महिन्याच्या उन्हाळ्यात आला आहे. त्यामुळे रोजेदारांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे, पण ही पण आपली परीक्षाच आहे. हजरत पैगंबर यांना उन्हाळ्यातील रोजे व तीव्र हिवाळ्यातील फजरची नमाज प्रिय होती. हिवाळ्याच्या तीव्र थंडीत सकाळी उठून नमाज आदा करणे व उन्हाच्या कडक तडाख्यात रोजे धरणे, ही ईश्वराकडून भक्ताची खरी परीक्षाच आहे. 

एखादा मजूर कडक उन्हात शरीरातून घामाच्या धारा वाहताना देखील आपले काम करीत असतो. अनेक प्रकारची कामे या मजूरांना उन्हाची, उष्णतेची तमा न बाळगता करावी लागतात. त्यांच्या कष्टाची जाणिव होण्यासाठी आपणही उन्हात जाऊन अनुभव घ्यायला हवा. रोजे धरले म्हणून केवळ उपाशी राहून चालत नाही तर शरीराच्या प्रत्येक अवयवातून याचा प्रत्यय यायला हवा. 

अकरा महिने स्वच्छंदी जीवन जगून आपल्यामध्ये ज्या वाईट सवयी रुढ झालेल्या असतात. त्या दूर करण्याचे प्रशिक्षण रमजान महिन्यात रोजाच्या रुपाने आपण घेत असतो. शरीराच्या प्रत्येक अंगाशी रोजा निगडीत असतो. खोटे न बोलणे, शिव्याशाप न देणे, निंदानालस्ती न करणे, अश्लील न बोलणे हा जीभेचा रोजा तर कुणावरही जुलूम न करणे, मारहाण न करणे हा हाताचा रोजा. वाईट न बघणे हा डोळ्यांचा रोजा तर चुकीच्या ठिकाणाकडे न जाणे हा पायांचा रोजा समजला जातो. 

रोजे धरुनही जर कुणी चुकीचे वागत असेल तर अशा रोजेदाराशी अल्लाहला काही ही देणे घेणे नाही. दैनंदिन जीवनात सचोटी, दया, करुणा, सहकार्य वृत्ती असणे आवश्यक आहे. या सर्व गुणधर्माची निर्मिती व जोपासना करण्याचे महत्वपूर्ण कार्य रोजातून होत असते. 

अल्लाहच्या प्रकोपाची अनामिक भिती मनात बाळगून रोजेदार आपला रोजा पूर्ण करीत असतो व हे करतांना सर्व प्रकारच्या वाईट बाबींपासून स्वतःचा बचावही करीत असतो. रोजेदाराची ही सचोटी व त्याचे हे सद वर्तन त्याला ईश्वराच्या जवळ घेऊन जाते. 

रोजाचा मोबदला साक्षात अल्लाहच निश्चित करीत असतो. रमजान महिन्यातील एक महिन्याचे होणारे परिवर्तन हे पुढील ११ महिन्यांसाठी न राहता उर्वरित पुढील संपूर्ण जीवनासाठी झाल्यास आपले जीवन खऱ्या अर्थाने झाले असे म्हणता येईल. (क्रमशः)

सलीमखान पठाण-9226408082.

To Top