रोजा, नमाज, तिलावते कुरआन, ईश्वराचे नामस्मरण (जिक्र) इत्यादी कार्य या काळात दररोज केले जाते. कोणत्याही कारणास्तव मशिद सोडता येत नाही. फक्त दैनिक गरजांसाठी बाहेर जाता येते. महिला घरातच एतेकाफ करतात. एतेकाफ मुळे बंदा (भक्त) व अल्लाह यांच्यात खूपच जवळीक निर्माण होते. एतेकाफ साठी वस्तीमधील मशिदीमधून किमान एका व्यक्तिने तरी दहा दिवस वास्तव्य करणे आवश्यक आहे. अन्यथा सर्व वस्तीवर गुन्हा लादला जातो.
किमान दहा दिवसांचा हा कालावधी पूर्ण करण्यासाठी आज सायंकाळ पासूनच ऐतकाफ सुरु करण्यात येईल. रमजानच्या शेवटच्या चरणात एक रात्र ही लैलतुल कद्र किंवा शबेकद्र म्हणून ओळखली जाते. शेवटच्या दहा दिवसातील विषम संख्येच्या २१, २३, २५, २७ व २९ या पाच रात्रींपैकी एक रात्र ही शबेकद्र आहे. तिचा शोध घेण्यासाठी या रात्रीत जास्तीत जास्त प्रार्थना केली जाते.
शबेकद्र च्या एका रात्रीच्या प्रार्थनेचे पुण्य हे हजार महिन्यांच्या पुण्या समान गणले जाते म्हणून या रात्रीत केल्या जाणाऱ्या प्रार्थनांना विशेष महत्व आहे.
पूर्वीच्या काळी लोकांचे आयुर्मान खूप होते. हजरत आदम अलै सलाम यांचे वय हजार वर्ष तर हजरत नुह यांचे ९६० वर्ष होते इतर लोकांचे वय ही वेगवेगळे होते. आजच्या काळात एवढ्या वयाच्या व्यक्ति जगात सापडणेच कठीण आहे.
आजच्या काळात सव्वाशे वर्षाच्या व्यक्ति ऐकण्यात वा पाहण्यात आल्या तरी आपल्याला आश्चर्य वाटते. कयामतच्या दिवशी आदम अलैसलाम पासून या जगात सर्वात शेवटी जी व्यक्ति येईल, असे सर्व जण गोळा झालेले असतील, मग ज्यांचे वय जास्त त्यांचे पुण्यही जास्त राहील मग आजच्या काळातील व्यक्ति पूर्वजांशी बरोबरी कशी करू शकेल ? यासाठी शबेकद्र सारख्या रात्रीचे नियोजन ईश्वराने केले आहे.
एका रात्रीत हजार महिन्यांचे पुण्यप्राप्त झाल्यास आपला पुण्याईचा आलेख वाढून पूर्वीच्पा लोकांशी बरोबरी करता येऊ शकते. शेवटच्या चरणातील लैलतुल कद्र च्या प्राप्तीसाठी शेवटचे दहा दिवसात दररोज रात्री अधिक वेळ प्रत्येकाने प्रार्थना केल्यास हजार महिन्यांच्या पुण्य प्राप्तीस ती व्यक्तिपात्र ठरु शकते.(क्रमशः)
सलीमखान पठाण-9226408082.