सोलापूर : कर्मचारी भरती करण्याकरिता बँकेचे प्रशासन नेहमीच दुर्लक्ष करत आलं आहे. संघटनेच्या माध्यमातून आम्ही वारंवार धरणे आंदोलन केले, निवेदनं दिली, निदर्शने केली, संप ही पुकारला, तरी सुद्धा बँक ऑफ महाराष्ट्राचे धीम्म प्रशासन नोकर भरती करत नाही. भविष्यामध्ये जर का बँक प्रशासनाने त्वरित नोकर भरतीचा निर्णय घेतला नाही, तर यापेक्षाही तीव्र आंदोलने करण्याचा इशारा महाबँक कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय नेते कॉ. धनंजय कुलकर्णी यांनी दिला.
जुळे सोलापूर येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेसमोर १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना कॉम्रेड कुलकर्णी हे बोलत होते. हातामध्ये आपल्या मागण्यांचे फलक घेऊन जिल्हाभरातून सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपामुळे बँक ऑफ महाराष्ट्राच्या जिल्यातील सर्व 52 शाखांचे कामकाज ठप्प झाले होते.
यावेळी इतर बँकेतील कर्मचारी संघटनांनी प्रत्यक्ष येऊन या संपास पाठिंबा जाहीर केला. याचबरोबर राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हा समन्वयक कॉ. अशोक इंदापुरे, युनायटेड फॉर्म बँक युनियनचे कन्व्हेनर कॉ. सुहास माडेकर, महाबँक सेवा निवृत्ती संघटनेचे कॉ. प्रसाद आतनुरकर, ग्रामीण बँक कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी कॉम्रेड कुसगल, पंजाब नॅशनल बँकेचे निवृत्त कर्मचारी कॉ. वीरभद्र माळगे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी आणि नारेबाजी करून संपाची तीव्रता वाढवत पाठिंबा जाहीर केला.
...चौकट...
बँक नफ्यात ; मग ग्राहकांना निकृष्ट सेवा का ?
बँक ऑफ महाराष्ट्राच्या प्रत्येक शाखेमध्ये कर्मचारी अधिकारी यांची संख्या अत्यल्प आहे. कर्मचारी नसल्यामुळे ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देता येत नाही, कामास उशीर होतो. त्यामुळे प्रत्येक वेळेला कर्मचाऱ्यांना ग्राहकांची नाराजी ओढवून घ्यावी लागते. ग्राहकांना अनेक वेळ ताटकळत रांगेत उभारावे लागते. बँक गेली अनेक वर्षे प्रचंड नफा कमावून उत्कृष्ट कामगिरी करीत आहे, मग या नफ्याच्या बदल्यात ज्या ग्राहकांच्या जीवावर हा नफा कमावला जातो, त्या ग्राहकांना निकृष्ट सेवा का दिली जाते.?
सुनील खैरे, ग्राहक.
...चौकट...
कर्मचाऱ्यांची शोषण करणारे बँक व्यवस्थापन
आहे, त्या कर्मचाऱ्यांचे कायम शोषण करण्याचे धोरण बँक व्यवस्थापनाने अवलंबले आहे. कर्मचाऱ्यांना रजा मिळत नाहीत. अनेक शाखांमध्ये शिपाई ही नाहीत. त्यामुळे त्या शाखेमधील कामे कंत्राटी पद्धतीने करून घ्यावी लागत आहेत.
बँकेचे व्यवस्थापन मनमानी पद्धतीने बँक चालवू पाहत आहे. संघटनासोबत केलेल्या करारांचे पालन बँकेकडून केले जात नाही. संघटनांचे ताब्यात घेतलेले ऑफिसेस सुद्धा बँकेच्या व्यवस्थापनाकडून संघटनांना परत दिले जात नाहीयेत. त्यामुळे एकूणच या मनमानी, दादागिरी व हुकूमशाही कारभाराविरोधात संघटनांनी आजचा संप पुकारल्याचे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी कॉ. संतोष चितळकर यांनी सांगितले.
...चौकट...
व्यवस्थापनाच्या दादागिरी विरोधातला संप
आजचा संप हा व्यवस्थापनाच्या दादागिरी, मनमानी विरोधात व नोकर भरतीच्या प्रमुख मागण्यासाठी होऊ घातलेल्या संघर्षाची सुरुवात असल्याचे व येथून हा लढा आणखी तीव्र करणार आहे. उत्तम ग्राहक सेवेसाठी नोकर भरती या प्रमुख मागणीसाठी करीत असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र मधील या संपास ग्राहकांनी पाठिंबा द्यावा, असं आवाहन यावेळी उपाध्यक्ष कॉ. उत्तम होळीकर यांनी केले.