सोलापूर : सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत असलेल्या तरुणानं समजावून सांगण्याच्या प्रयत्नात असलेल्या पोलीस निरीक्षकाला मारहाण केलीय. हा खळबळजनक प्रकार बुधवारी सायंकाळी रामलाल चौकातील प्रजा मटन स्टॉलच्या बाजूला घडला. पोलीस निरीक्षक माने असं दुखापत झालेल्या अधिकाऱ्याचं नांव आहे. या धूडगूस प्रकरणी नाईन्ट्या ऊर्फ ओंकार संतोष नलावडे याच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नाईन्टया ऊर्फ ओंकार नलावडे (रा. सुंदराबाई डागा प्रशालेच्या जवळ, बांद वस्ती, दमाणी नगर.) आणि अन्य दोन-तीन जणांत प्रजा मटन स्टॉलच्या बाजूला तक्रार सुरु होती. त्यावेळी नाईन्टया ऊर्फ ओंकार हा स्वतःहून रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथवर स्वतःचे डोके व तोंड आपटून घेत असल्याने त्याच्या डोक्यातून रक्त येत होते.
त्यास रिक्षातून पोलीस ठाण्यात आणत असताना रिक्षामध्ये पो.कॉ. दिनेश घंटे यांच्या अंगावर थूंकून शिवीगाळ करीत पो.कॉ. घंटे यांच्या शर्टाला धरुन ओढा-ओढी केली. पोलीस ठाण्यात उपचाराची वैद्यकीय यादी तयार करीत असताना नाईन्ट्याने त्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ करुन पुन्हा अंगावर थुंकला.
तो पोलीस ठाण्याच्या आवारात आरडा-ओरडा करीत असताना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी त्यास शांत बसण्यास सांगत असताना त्याने माने यांच्या छातीवर डावे बाजूस हाताने बुक्की मारली. त्यावेळी त्यास अडवत असताना त्याने हाताने माने यांच्या उजव्या हाताचे मनगटाजवळ मारल्याने जबर मुका मार लागला.
नाईन्ट्या ऊर्फ ओंकार नलावडे यानं पोलीसांच्या शासकिय कामात अडथळा आणून पो.कॉ. घंटे यांना धक्का-बुक्की करुन गोंधळ घातला. या घटनेत पोलीस निरीक्षक माने यांच्या छातीवर मारहाण करुन जबर दुखापत केल्याप्रकरणी पो.कॉ. घंटे यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
त्यानुसार पोलीस ठाण्याच्या आवारात धुडघूस घालून पोलीस अधिकाऱ्याला मारहाण व कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून अंगावर थुंकल्याप्रकरणी घालून नाईन्ट्या ऊर्फ ओंकार नलावडे याच्याविरुद्ध भा.न्या. सहिंता कलम १३२,२२१(१),३५२,३५१ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.