बहुजनांचा आवाज हरपला ! ज्येष्ठ इतिहासकार प्रा. मा. म. देशमुख यांचे निधन

shivrajya patra

नागपूर : इतिहासाची नवीन मांडणी, बहुजन जागृतीसाठी लेखन, जवळपास ६ दशकं बहुजनांमध्ये जनजागरणासाठी अखंड प्रयत्नशील ज्येष्ठ इतिहासकार प्रा. मा. म. देशमुख यांचे बुधवारी पहाटे निधन झाले. ते ८९ वर्षीय होते. सायंकाळी ४ वाजता दरम्यान कोतवाल नगर निवास, नागपूर येथून अंत्ययात्रेस प्रारंभ होऊन सहकार स्मशान भूमी, सोनेगाव, वर्धा रोड, नागपूर इथं शिवधर्म पध्दतीने दहन संस्कार होतील, अस त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आलं. प्रा. देशमुख यांच्या निधनानं बहुजनांचा आवाज हरपल्याची भावना व्यक्त होत आहे, तर काहींनी त्यांच्या सानिध्यातील स्मृति जाग्या केल्या.

प्रा. मा.म. देशमुख हे शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आले. शिक्षणाची त्यांना प्रचंड आवड होती. प्री-युनिव्हर्सिटी परीक्षेत ते मेरीट उत्तीर्ण झाले होते. इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय होता. त्यांची चिकित्सक वृत्ती असल्याने ते इतिहासातील सत्यता बाहेर काढायचे. १९५४-१९६३ पर्यंत नागपूर महापालिकेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते.

त्यांनी जनता कला वाणिज्य महाविद्यालय मलकापूर येथे प्राध्यापक म्हणून काम केले. १९६४ नंतर धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर मध्ये इतिहास विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. १ ऑगस्ट १९९६ ला सेवानिवृत्त झाले. 

मध्ययुगिन भारताचा इतिहास या ग्रंथाचा माध्यमातून राजकीय, सामाजिक, संशोधन साहित्य क्षेत्रात त्यांनी प्रचंड नावलौकिक मिळविला होता. त्यांच्या निधनानं बहुजन समाज व चळवळीची मोठी हानी झाल्याची खंत व्यक्त होत आहे. 

त्यांच्या मध्ययुगीन भारताचा इतिहास (महाराष्ट्र शासनाने बंदी घातली, हायकोर्टाने बंदी उठवली.) ग्रंथ प्रकाशित झाल्यावर त्यांचा इतिहासाचा मारेकरी उल्लेख करणाऱ्या  एका समुहानं त्या ग्रंथाविरुध्द त्यांचा रोष व्यक्त करताना न्यायालयीन लढ्याबरोबर १९६७ मध्ये प्रा. देशमुख यांची जिवंतपणी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढल्याचे व प्रा. देशमुख यांच्या समर्थनार्थ बहुजनांनी काढलेल्या विजयी यात्रेची छायाचित्रे त्यांच्या राष्ट्र जागृती लेखमाला पुस्तकाच्या मलप्रष्ठावर असायची. राष्ट्र जागृती लेखमाला अंर्तगत प्रा.मा.म.देशमुख यांनी  ग्रंथ लिहिले.

त्यात प्रामुख्यानं अभिनव अभिरूप, अभ्यास असा करावा, जय जिजाऊ, प्राचीन भारताचा इतिहास, बहुजन समाज आणि परिवर्तन, बौद्ध धम्म आणि शिवधर्म, भांडारकर झॉंकी है, शनिवारवाडा बाकी है,मनुवादी शिवस्मारक होऊ देणार नाही, मनुवाद्याशी लढा (नववी आवृती), मराठा कुणबी समाजाची दशा आणि दिशा, मराठ्यांचे दासीपुत्र (संपादित), युगप्रवर्तक शिवराज आणि मराठ्याची शौर्यगाथा, रामदास आणि पेशवाई, वंश भाषा श्रेष्ठत्व आणि सत्य, राष्ट्रनिर्माते, शिवराज्य, शिवशाही, सन्मार्ग, समाज प्रबोधन आणि साहित्यिकांची जबाबदारी यासह अनेक पुस्तके आणि ग्रंथांचं लेखन केलं होतं.

त्यातील मध्ययुगीन भारताचा इतिहास या ग्रंथावर महाराष्ट्र शासनाने बंदी घातली होती. पण अवतरण चिन्हापर्यंत लढून देशमुखांनी हायकोर्टाकडून बंदी उठवली. त्यांच्या पुस्तकांचे वैशिष्ट्य म्हणजे 'ना नफा, ना तोटा' तत्त्वावर विक्री असलेल्या त्यांच्या पुस्तकांचा प्रचंड खप आहे. 

सरांच्या जाण्याने जगभरातील सर्वच बहुजन समाजातील चळवळी पोरक्या : पुरुषोत्तम खेडेकर

सर्वांचेच मार्गदर्शक व  सुमारे साठ वर्षे भारतीय बहुजन समाजाला ज्ञानी करुन अज्ञान मुक्त, शोषण मुक्त करण्यासाठी सत्य इतिहास जनसामान्यांच्या समोर आणण्यासाठी जीवाचे रान करणारे इतिहासकार, वक्ता, लेखक, प्रबोधनकार, समाज सुधारक आदरणीय शिवश्री मा. म. देशमुख सर यांचं बुधवारी, १९ मार्च रोजी पहाटे वृद्धापकाळाने कोतवाल नगर, नागपूर येथील निवासस्थानी निधन झाले. ही बातमी सर्वांसाठींच वेदनादायक व धक्कादायक आहे. सर्वच बहुजन समाज दुःखात बुडाला आहे. कोणी कोणाला सावरायचे ? जिजाऊ सर्वांनाच सावरण्यासाठी बळ देवो, हीच जिजाऊ चरणी प्रार्थना...

स्मृतीशेष शिवश्री मा. म. देशमुख सरांची सुमारे तीन महिन्यांपूर्वी त्यांच्या जन्मदिनी व सदिच्छा भेट घेऊन मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांसह आम्ही दोघांनीही अभिनंदन केले होते. त्यांचा उत्साह प्रेरणादायी होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या गुन्हेगार कोरटकर विरोधात नुकतीच सरांनी प्रतिक्रिया दिली होती.

सरांच्या जाण्याने जगभरातील सर्वच बहुजन समाजातील चळवळी पोरक्या झालेल्या आहेत. मराठा सेवा संघ व अशा हजारो पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने स्मृती शेष आदरणीय प्रा. शिवश्री मा. म. देशमुख सर यांना भावपूर्ण शिवांजली अर्पण, सरांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार त्यांचे जीवन कार्य जीवंत ठेऊन समाज जागृती करत राहणे, हीच सरांना खरी श्रद्धांजली ठरेल.
आमच्या खेडेकर कुटुंबियांच्या वतीने भावपूर्ण शिवांजली अर्पण...!

पुरुषोत्तम खेडेकर, चिखली .
दिनांक : १९ मार्च २०२५.

To Top