उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी 'अशी' घ्यावी काळजी; आरोग्य अधिकाऱ्यांचे आवाहन

shivrajya patra

सोलापूर : उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी उन्हात बाहेर जाताना डोक्यावर टोपी, टॉवेल किंवा उपरणे वापरणे, उन्हात बाहेर पडताना गॉगल किंवा चष्माच्या वापर, लहान मुलं किंवा प्राण्यांना कारमध्ये बंद करून जाऊ नये. विशेषतः लहान मुले, गरोदर स्त्रिया आणि ज्येष्ठ नागरिकांनी शक्यतो सकाळी किंवा सायंकाळीच कामानिमित्ताने घराबाहेर पडावे. बाहेरील ज्युस, पाणी व खाद्यपदार्थांचा वापर टाळावा आणि शक्यतो फिल्टरचे पाणी, ताक, लिंबू शरबत, नारळ पाणी इत्यादिचा वापर करावा असं आवाहन सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी केलं आहे.

सोलापूर जिल्ह्यात उन्हाळी झळा वाढल्या असून कमाल तापमान ३८ अंशावर जात आहे. दरवर्षी येथील सुर्याचा पारा उच्चांक गाठतो, अशा तप्त उन्हात नागरीक उष्माघाताला बळी पडू नये, यासाठी सोलापूर शहर महानगरपालिका, उष्माघात कृती आराखडा राबविणार आहे.

नागरिकांनी कुलरसह, उष्णतारोधक पेंट जर घराच्या छतावर मारले तर २ ते ३ डिग्री तापमान कमी होण्यास मदत होईल. गतवर्षी शहरात विविध जागी सेवा भावी संस्था तर्फे पाणपोईची व्यवस्था करणेत आली होती. तशीच सोय या वर्षी त्याहून अधिक स्वयंसेवी संस्था करणार आहेत. बेघर लोकांसाठी व उन्हाळ्यात नागरिकांसाठी पोलिस प्रशासन, स्वयंसेवी संस्थासह इतरांनी सहकार्य करण्याचं आवाहन या निमित्ताने करण्यात येत आहे. 

ट्राफिक सिग्नल दुपारी बंद ठेवणे, सार्वजनिक खेळांचे आयोजन दुपारी न करणे, सार्वजनिक बगीचे सुरू राहण्याचे वेळेत वाढ करणे, बांधकाम कंत्राटदाराद्वारे मजुरांच्या कामाचे वेळेत बदल व जनजागृती करण्याचे सूचना नागरी आरोग्य केंद्राद्वारे दिल्या आहेत. रूग्णवाहिकेचा यात सहभाग करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

उष्माघाताची कारणे : उन्हाळयात हमाल, शेत मजूर, विट भट्टी कामगार फार वेळ कामे करणे, कारखान्याच्या बॉयलर रूममध्ये काम करणारे, अधिक तापमानाच्या खोलीत काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर इ.

उष्माघाताची लक्षणे : थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, पोटऱ्यात वेदना किंवा गोळे येणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैनी अस्वस्थता, बेशुध्द अवस्था.

संरक्षणाकरिता प्रतिबंधात्मक उपायः सकाळी किंवा सायंकाळी शक्यतो कमी तापमान असताना कामे करावीत. सैल पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावे, सरबत, पन्हे किंवा साधे पाणी अधून मधून घेत राहावे, असेही आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.


To Top