सोलापूर : वाहतुक कारवाई संबंधाने रात्र ड्युटीसाठी असलेल्या वाहतुक शाखेकडील पोलीस कर्मचाऱ्यांच्या जागरूकतेमुळे 8, 64, 000 रुपये किंमतीचा 48 किलो गांजा हस्तगत करण्यात आलाय. हा प्रकार सोलापूर-पुणे सर्व्हिस रोड जंगली हॉटेल जवळ,विजापूर बायपास ओव्हर ब्रिजचे सर्व्हिस रोडवर मंगळवारी रात्री 11.15 वा. च्या सुमारास घडला. पोहेकॉ/34 प्रकाश निकम आणि पोकॉ/1532 भालेराव यांनी वाहन तपासणी दरम्यान विटकरी कलरची कार (MH 47/AN 8917) ची तपासणी करीत असताना त्या कारमध्ये गांजा आढळला.
सोलापूर शहर उत्तर वाहतुक शाखेकडील पोहेकॉ/34 प्रकाश निकम आणि पोकॉ/1532 भालेराव वाहनाची तपासणी करत असताना त्याचा चालक हा कागदपत्र दाखवितो, असा बहाणा करून फोनवरुन बोलत दूर जाऊन अंधाराचा फायदा घेवून त्यानं पलायन केलं. त्यावर वाहनाचा संशय आल्याने उभयतांनी आतमध्ये पाहणी केली असता, सदर वाहनाचे डिक्कीमध्ये गांजा दिसून आला.
त्यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्याशी संपर्क साधून माहीती दिली. वरिष्ठांना माहीती दिल्यावर पोनि तानाजी दराडे यांना पुढील कायदेशीर कारवाई करणेबाबत सुचीत करण्यात आले. त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करुन फौजदार चावडी पोलीस ठाण्यात कार (MH 47/AN 8917) चालकाविरुध्द NDPS Act कलम 8(C), 20 (B) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या कारवाईत 48 किलो गांजा, ज्याची सरकारी किंमत 8, 64, 000 रुपये तसेच कार क्र.MH 47/AN 8917 हे वाहन ज्याची अंदाजे किंमत 6, 00, 000 रुपये असा 14, 64, 000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. हा गांजा कोठून आणला, कोठे घेऊन जात होता तसेच या गुन्ह्यासाठी वापरलेली गाडी कोणाची आहे ? या अनुत्तरीत प्रश्नांचा तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलंय.
ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त (विभाग-1) प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पो.नि. तानाजी दराडे, सपोनि शंकर धायगुडे, सपोनि रोहन खंडागळे, पोह/1232 प्रविण चुंगे, पोकॉ/1456 कृष्णा बडुरे, पोकॉ1617 दत्तात्रय कोळवले, पोकॉ/ 1612 नितीन जाधव यांनी पार पाडली. पोलीस निरीक्षक तानाजी दराडे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.