डॉ. जगदाळे जयंतीनिमित्त आयोजित विभागीय निमंत्रित खो-खो स्पर्धेत छत्रपती मंडळ विजेते
बार्शी : विद्यार्थ्यांनी खेळाडूंची जिद्द व चिकाटी जवळून पाहता यावी, विद्यार्थ्यांना टी. व्ही. व मोबाईलपासून दूर ठेवणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शारीरिक शिक्षण व क्रीडा अत्यंत महत्वाच्या आहेत. सर्व खेळाडूंना भविष्यात विविध सामन्यात यश मिळो, अशी सदिच्छा संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रकाश पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली.
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीचे संस्थापक व संवर्धक कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे यांच्या 122व्या जयंतीनिमित्त कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शीने महाराष्ट्र खो खो असोसिएशन व सोलापूर खो खो असोसिएशन यांच्या मान्यतेने ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत सातारा, सोलापूर व धाराशिव या जिल्ह्यातील आठ संघ सहभागी झाले होते.
कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या कर्मवीर मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात धारशिवने मध्यंतरासच 13-8 अशी निर्णायक आघाडी घेतली होती. अनिकेत पवार, रोहित चव्हाण, विजय शिंदे व रोहन गुंड हे धाराशिवच्या विजयाचे मानकरी ठरले.
सोलापूरच्या किरण स्पोर्टस्ला 16-14 असे 2 गुण व सात मिनिटे राखून नमवित धाराशिवच्या छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळाने कर्मवीर चषक विभागीय निमंत्रित पुरुष खो-खो स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.
पारितोषिके महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. चंद्रजीत जाधव, शिवशक्ती बँकेचे चेअरमन डॉ. प्रकाश बुरगुटे, संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रकाश पाटील, सहसचिव ए. पी. देबडवार यांच्या हस्ते देण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, खजिनदार जयकुमार शितोळे, प्राचार्य डॉ. एस. एस. गोरे, सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस अजितकुमार संगवे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे, निवृत्त तालुका क्रीडा अधिकारी सत्येन जाधव, भारतीय खो-खोपटू रामजी कश्यप, प्रदीप लोंढे, स्मिता बुरगुटे, अप्पांच्या करामती फेम, अमृत नाना राऊत, स्पर्धा निरीक्षक प्रवीण बागल, राजाभाऊ शिंदे, माजी प्राचार्य डॉ. सी. एस. मोरे, व्ही. एस. पाटील, डॉ. दिलीप मोहिते, डॉ. एस. एम. लांडगे आदींची उपस्थिती होती. पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनरल सेक्रेटरी प्रकाश पाटील होते.
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना क्रीडा व खेळ विषयी शास्त्रशुद्ध माहिती व्हावी, या हेतूने या स्पर्धा आयोजित केल्याचे अध्यक्षीय भाषणात प्रकाश पाटील यांनी यावेळी म्हटले.
अंतिम सामन्यात अनिकेत (1.00, 1.40 मिनिटे संरक्षण व 3 गुण) व रोहित (1.30 मि. व 4 गुण) यांनी अष्टपैलू आणि विजयने (2.00. 1.30 मि.) संरक्षणाची व तर रोहनने (4 गुण) आक्रमणाची बाजू सांभाळली. किरण स्पोर्टसच्या अक्षय इंगळे (1.10 मिनिटे व 3 गुण) व निरज कोळी (1.00 मिनिटे व 3 गुण) यांचे प्रयत्न अपुरे पडले.
तृतिय स्थानासाठी झालेल्या सामन्यात मध्यंतरापर्यंत 9-9 अशी बरोबरी असलेल्या धाराशिवच्या श्री. तुळजाभवानी क्रीडा मंडळाने वेळापूरच्या अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळास 22-17 असे 6 गुणांनी नमविले. यात हरद्या वसावेने 1.20,1.10 मिनिटे संरक्षण करीत 4 गडी टिपले. राज जाधवाने याने आक्रमणात 5 गडी टिपले. वेळापूरकडून गणेश बोरकर (4 गुण व 1.00 मि.) व कृष्णा बसनोडे (1.30 मि. व 2 गुण) यांची लढत अपुरी पडली.
यावेळी अक्षय इंगळे या खेळाडूने मनोगतातून भोजन, निवास, मैदान व तांत्रिक बाबीबद्दल समाधान व्यक्त केले. श्रीरंग बनसोडे यांनी पंच म्हणून मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. चंद्रजीत जाधव म्हणाले, शारीरिक शिक्षण व क्रीडा यातूनच विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी आहेत. क्रीडा व खेळ याकडे सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे. यातूनच खेळाडूंना प्रोत्साहन मिळते असे त्यांनी सांगितले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी एम. पी. एड. विभाग प्रमुख डॉ. एस. एम. लांडगे, बी. पी. एड. विभाग प्रमुख डॉ. ए. जी. कांबळे, बी. एड. विभाग प्रमुख डॉ. व्ही. पी. शिखरे, स्पर्धा सचिव डॉ. एस. एस. मारकड, प्रा. स्मिता सुरवसे, प्रा. पी. पी. नरळे, प्रा. शरद सावळे, प्रा. के. बी. चव्हाण, प्रा. स्वप्नील अंधारे, कॉलेजचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विविध समितीचे सदस्य, बी. पी. एड. व एम. पी. एड. विभागाचे प्रशिक्षणार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.
यावेळी खेळाडूंसाठी यू ट्यूब फेम अप्पांच्या करामती कार्यक्रम सादर करण्यात आला. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी बार्शी व परिसरातील अनेक क्रीडा प्रेमी, माजी राष्ट्रीय खेळाडू व उदयोन्मुख खेळाडू उपस्थित होते.
कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एस. एस. गोरे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. शरद सावळे यांनी करून दिला. उपस्थितांचे आभार स्पर्धा सचिव डॉ. एस. एस. मारकड यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्मिता सुरवसे व प्रा. पी. पी. नरळे यांनी केले.
–-- स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ खेळाडू :
अष्टपैलू-खेळाडू रोहित चव्हाण, संरक्षक-विजय शिंदे (दोघे छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ, धाराशिव आक्रमक-अक्षय इंगळे (किरण स्पोर्ट्स सोलापूर). स्पर्धेतील प्रथम चार संघ : छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ धाराशिव (रुपये 21 हजार रोख व ट्रॉफी), किरण स्पोर्ट्स क्लब सोलापूर (रुपये 15 हजार रोख व ट्रॉफी ), श्री तुळजाभवानी क्रीडा मंडळ धाराशिव (रुपये 11 हजार रोख व ट्रॉफी), अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळ, वेळापूर (रुपये 5 हजार रोख).