जनकल्याण यात्रेद्वारे योजनांचा होणार जागर
विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा प्रचार व प्रसारासाठी जनकल्याण यात्रेला सुरुवात
ही यात्रा एकूण पंधरा दिवस सुरू राहणार असून, सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथून या जनकल्याण यात्रेचा शुभारंभ निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, तहसिलदार निलेश पाटील, तहसिलदार शिल्पा पाटील, लोकमंगल सहकारी बैंकेचे संचालक प्रल्हाद कांबळे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी व नागरिक यावेळी उपस्थित होते.
या यात्रेकरता एलईडी व्हॅनद्वारे दाखवण्यात येणाऱ्या माहितीपटाची निर्मिती व दिग्दर्शन शंकर बारवे यांनी केलीय. या माहितीपट मोबाईल एलईडी व्हॅनद्वारे राज्यातील विविध गावात व शहरात दाखविण्यात येऊन जनजागृती करण्यात येत आहे. त्याद्वारे लाभार्थ्यांपर्यंत योजनेची माहिती पोहचविण्यात येणार आहे.
या माहितीपटाद्वारे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले, “आपले राज्य सरकार आणि केंद्र सरकार समाजातील गोरगरीब, वंचित, ज्येष्ठ, वृद्ध, विधवा आणि दिव्यांगांच्या कल्याणासाठी कटीबद्ध आहे. केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकार या सर्वांसाठी विशेष अर्थसहाय्य योजना राबवत आहे.
या विविध योजना राबवताना संबंधित लाभार्थ्यांना सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नये, त्यांना मिळणारी रक्कम थेट त्यांच्या हातात मिळावी, यासाठी डी.बी.टी. पोर्टलद्वारे त्यांना त्यांची विशेष सहाय्य मदत त्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येते. या योजनेतून भ्रष्टाचार, दिरंगाई थांबली आहे.
समाजातील गरजू, निराधार, निराश्रीत आणि वृद्धांच्या कल्याणासाठी राज्य सरकार नेहमीच कटीबद्ध आहे आणि यापुढेही राहील. समाजातील सर्व गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना या विविध योजनेंतर्गत आर्थिक मदत मिळावी, यासाठी विशेष सहाय्य विभाग कार्यरत असून या योजनेचा प्रसार राज्यभर करण्यात येत आहे, तरी सर्व पात्र लाभार्थी यांनी योजनांचा लाभ घ्यावा.” असं सूचित करण्यात आलंय.