रमजान महिन्याचा काळ जसजसा संपत आहे, तशी ईदची तयारी सुरू झाली आहे. बाजारपेठेत कपडे व इतर साहित्य खरेदी सुरु झाली आहे. जकात आदा करुन गरजूंना मदत करण्याची लगबग वाढली आहे.
जवळचे गरजू नातेवाईकांना मदत पोहोच झाली असून देशभरातील मदरसांच्या सफिरांनी आपली वसूली केली आहे, काही करत आहेत.एकमेकांना साह्य करण्यासाठी हात पुढे सरसावले आहेत. मानवतेच्या भावनेतून मदतीचा ओघ कोणत्याही सरकारी मदतीशिवाय सुरु आहे.
हजरत पैगंबरानी सांगितलेल्या मार्ग व कुरआन मधील मार्गदर्शनानुसार वर्तन करण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करीत असून रमजान महिन्याच्या पुण्यपर्वाचा लाभ घेण्याचा प्रयत्न प्रत्येक जण आपल्या परीने करीत आहे.
अलीकडच्या काळात काही घटना या मनाला खूप वेदना देतात. हे पाहून एक विचार मनात आला कि, आपल्या देशात सर्व जाति-धर्माचे लोक गुण्या-गोविंदाने राहतात. भाजी विकणारा, दुधवाला, किराणावाला, डॉक्टर, ड्रायव्हर व इतर अनेक क्षेत्रात सर्व जातिधर्माची माणसे एकत्र वागतात, व्यवहार करतात. पण त्यांच्यात कधी जात आडवी येत नाही.
भाजी विकणाऱ्याला त्याची जात कुणी विचारीत नाही कि, किराणा वाला कोण आहे, हे कुणी पाहत नाही. फिरोजच्या दुकानात मटन चांगले मिळते, म्हणून शहरातील सर्व समाजाचे लोक तेथे गर्दी करतात तर जुसफच्या दुकानातून शहरातील सर्व व्यापारी तेल खरेदी करतात.
गुजराणीच्या दुकानातून शेकडो मुस्लीम किराणा खरेदी करतात. दैनंदिन जीवनात जाती धर्माचा विचार कुणीही करीत नाही, पण गेल्या दहा वर्षात देशात सत्तांतर होऊन सत्ताधारी आल्यापासून समाज विघटनाची प्रक्रिया सुरु झाल्यासारखे दिसत आहे. तेच गाव, तोच समाज, तेच लोक असतांना आता तेढ वाढतेय.
नागरिकांचे मूलभूत प्रश्न व समस्या सोडविण्याऐवजी नको ते प्रश्न निर्माण करुन लक्ष विचलीत केले जात आहे. 'हे विश्वचि माझे घर' ही ज्ञानेश्वरांनी मांडलेली संकल्पना मोडीस काढून वेगळ्या पध्दतीने केवळ मुस्लीम विरोध निर्माण करण्याचा प्रयत्न काही शक्ति करीत आहेत. याला मिडिया खतपाणी घालत आहे. विरोधी पक्ष दीन आणि हीन झाला आहे.
या परिस्थितीतही काही समजूतदार माणसंही या बेफाम सुटलेल्या वारु ला आवरण्याचा प्रयत्न करीत आहेत. खरं तर इस्लाम धर्माने कुणाचा द्वेष करण्याची शिकवण दिलेली नाही. सर्वांनी एकोप्याने राहून देशाचा विकास साधावा आणि सर्वांची प्रगती व्हावी, हेच आपल्यासाठी आवश्यक आहे. (क्रमशः)
सलीमखान पठाण-9226408082.