रमजान महिन्यात सर्व मशिदी या भक्तांनी फुलून गेलेल्या असतात. गर्दीचा जणू महापूर आलेला असतो. पाच ही वेळची नमाज तसेच तरावीहच्या नमाजसाठी भक्तिभावाने सर्वांनी हजेरी लावलेली असते. नमाज ही अल्लाहसाठी आदा केली जाते, तशी प्रतिज्ञा (निय्यत) करुनच तिचा प्रारंभ होतो.
एका रांगेत (सफ) एकमेकाला खेटून सर्वजण उभे राहतात. यावेळी कोण कोणाच्या शेजारी उभा राहील याचे बंधन नसते. बादशाहच्या शेजारी गुलाम, राजा शेजारी रंक, गोऱ्या शेजारी काळा असा कोणीही उभा राहू शकतो. तेथे कोणी उच्च किंवा कनिष्ठ नसतो. सर्वजण समान असतात.व्ही. आय. पी. दर्शन ही पध्दत तेथे नसते.
नमाजची निश्चित केलेली वेळ झाल्यावर कुणाची ही वाट न पाहता प्रार्थनेला प्रारंभ होतो. मशिद हे अल्लाहचे घर असून तेथे सर्व समान आहेत. कोणताही भेदभाव तेथे केला जात नाही. खलिफा, बादशाह, सुलतान यांच्या काळात व आज ही जेथे इस्लामी राजवट आहे, अशा देशात बादशाह व त्याचे नोकर चाकर एकमेकांच्या शेजारी उभे राहून अल्लाहची प्रार्थना करतांना तसेच रोजा ईफ्तार करतांना एका ताटात बसलेले पहावयास मिळतात. समानता किंवा मसावात हे इस्लाम धर्माचे मुख्य सूत्र आहे.
हजरत पैगंबरांनी त्यांच्या जीवनात जेव्हा हजच्या प्रसंगी शेवटचा खुत्बा (प्रवचन) दिला. त्यावेळी जाहीर केले कि, लोक हो, आज तुमच्यावर तुमचा धर्म मी पूर्ण केला आहे. माझ्यावर जी जबाबदारी अल्लाहने दिली होती, ती सर्व मी, तुमच्यापर्यंत पोहोचविली आहे. तुम्ही सर्व समान आहात. कुणाचेही कुणावर वर्चस्व नाही. काळा, गोरा, अरबी व अरबेतर असा कोणताही भेद इस्लाम मध्ये नाही. तुम्ही सर्व एकमेकाचे भाई-भाई आहात.
इस्लामला जातीभेद मान्य नाही. पोटजाती हा प्रकार आपल्याकडे मुस्लिमांमध्ये व्यावसायावरुन पडला आहे. धर्म म्हणून इस्लाम व जात म्हणून मुस्लीम किंवा मुसलमान एवढी एकच जात मान्य आहे. शासनाच्या सवलतीसाठी जातीभेद हा इस्लाममध्ये मान्य नाही.
सर्वांनी एकदिलाने रहावे, आपल्यातील गरजूंना सर्वांनी मिळून मदत करावी व त्यांचा भार हलका करावा. कुणीही विकासापासून वंचित राहू नये.सर्वांना प्रगतीच्या समान संधी प्राप्त व्हावी, ही इस्लाम धर्माची शिकवण आहे. रमजान महिन्यातील विविध उपक्रम हे या समानतेचाच एक भाग आहे. (क्रमशः)
सलीमखान पठाण-9226408082.