सोलापूर : सोलापूर शहरात प्रदूषणाची लाट पसरत असून, या प्रदूषणाचा शहरवासीयांवर अतिशय गंभीर असा परिणाम होऊन, वेगवेगळे असे संसर्गजन्य रोग होत आहेत. हे होणारे संसर्गजन्य रोग रोखण्यासाठी, योग्य ते उपाय करावे, अशा मागणीचे निवेदन 'मी सोलापूर माझे सोलापूर'; परिवर्तन व विकास समितीचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली, सोलापूर जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधीक्षकांना देण्यात आले आहे.
अधीक्षकांना देण्यात आलेल्या निवेदनात, सध्या सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत असून प्रदूषणामुळे लहान मुले, वृद्ध माणसे, व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. त्यामुळे श्वसनाचे आजार व वेगवेगळे आजार वाढत आहेत, उत्तरोत्तर शहरात प्रदूषणाची समस्या जटिल बनत असल्याचा उल्लेख प्रामुख्याने करण्यात आलाय.
जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी, या नात्याने आजवर आपण प्रदूषण रोखण्यासाठी कोणती कारवाई केली, महानगरपालिका आणि आरोग्य विभागाला कोणत्या उपाययोजना करण्याबाबतचा आराखडा दिला, यासंदर्भात माहिती मिळावी, सोलापुरातील प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने, कोणत्या उपाययोजना केल्या व करणार आहे का नाही? या सर्व बाबींचा खुलासा करावा, अशी मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने मागणी करत असल्याचे निवेदन देण्यात आले.
विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली, जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना देण्यात आलेल्या निवेदन शिष्टमंडळात रेखा आडकी, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, विठ्ठल कुराडकर, राधिका मिठ्ठा, लक्ष्मी इप्पा, आदी उपस्थित होते.
फोटो ओळ : जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधीक्षकांना निवेदन देताना, समितीचे अध्यक्ष, विष्णू कारमपुरी व 'मी सोलापूर माझे सोलापूर'; परिवर्तन विकास समितीचे पदाधिकारी दिसत आहेत.