' माझ्या पैशाची दारू पित आहे, तुझ्या बापाची पित नाही ' तरुणांची खाकी वर्दीपर्यंत मजल; गुन्हा दाखल

shivrajya patra

सोलापूर : ' माझ्या पैशाची दारू पित आहे, तुझ्या बापाची पित नाही ' असं रागात बोलून कारमधून उतरलेल्या तरुणानं खाकी वर्दीतल्या पोलीस कर्मचाऱ्याला गच्ची पकडून मारहाण केली. ही भयावह घटना साखर पेठेत बुधवारी रात्री साडे दहा वा. च्या सुमारास घडली. चापोहेकॉ/१५१६ कुंभार असं त्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. शासकीय कामात अडथळा करून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्या प्रकरणी किरण श्रावण क्षीरसागर (वय-३२ वर्षे) याच्यासह दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, जेलरोड  पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले चापोहेकॉ/१५१६ कुंभार पीसीआर-१ मधून पोह १७२७ मेडके, पुहोम ३८ शेख असे बुधवारी रात्री हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी इर्टीगा कार (एमएच १३/सी के १६८३) मध्ये दोन तरुण दारू पित असताना मिळून आले. 

त्याबाबत विचारणा केली असता, किरण श्रावण क्षीरसागर, (वय-३२ वर्षे, रा- १०२/४ इंदिरा वसाहत भवानी पेठ सोलापूर) आणि लकी भिमराव गायकवाड (रा-१०२/ए,९० जुना तुळजापूर नाका, सोलापूर) पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत पीसीआर मोबाईलमधून बाहेर काढले, अन् हाताने गालावर मारले तसेच धक्काबुक्की करून दुखापत केली.

याप्रकरणी चापोहेकॉ कुंभार यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार चापोहेकॉ कुंभार करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणून मारहाण केल्या प्रकरणी भा.न्या. सहिंता कलम १३२,१२१(१),३(,५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस उपनिरीक्षक डेरे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

To Top