बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर रॅली प्रदर्शन

shivrajya patra

भंडारा : महाबोधी महाविहार टेम्पल ऍक्ट 1949 रद्द करून भारतीय बौद्ध आणि जागतिक बौद्ध यांना विश्वासात घेऊन नवीन बौद्ध कायदा निर्माण करून महाबोधी महाविहार बौद्ध लोकांना द्यावा, यासह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधले जावे, यासाठी पाच चरणात देशव्यापी चरणबद्ध आंदोलनाचे आयोजन केले आहे. तिसऱ्या टप्प्यात शनिवारी, 22 मार्च ला जिल्हा मुख्यालयावर रॅली प्रदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे जिल्हा संघटक अभय रंगारी यांनी दिलीय.

तथागत गौतम बुद्ध यांना ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झाले, त्या ठिकाणी चक्रवर्ती सम्राट अशोक महापराक्रमी राजाने महाबोधी महाविहार बांधले होते, ते ठिकाण युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ घोषित केले आहे, मात्र या पवित्र जागेवर परकीय परधर्मियांचा अवैध ताबा आहे. त्यामुळे जागतिक बौद्ध धम्मा ला अनुसरणाऱ्या जनतेच्या भावना दुखावल्या जात आहेत. 

भारत सर्वधर्म समभाव असणारा देश असून सुद्धा असा भेदभाव होत असल्याने भारताच्या 31 राज्यात 565 जिल्ह्यातील 22 हजार विभागातील 06 लाख गावातील जनतेच्या पाठींब्याने देशव्यापी चरणबद्ध आंदोलनाचे आयोजन करण्यात आलं आहे. 

पहिल्या टप्प्यात 03 मार्च ला जिल्हाधिकारीमार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात 08 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात 22 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर रॅली प्रदर्शन होणार आहे. शास्त्री चौक ते त्रिमूर्ती चौक असा रॅली चा मार्ग असणार आहे. 09 एप्रिल रोजी भारतभर जेल भरो आणि मंगळवारी, 01 जुलै रोजी भारत बंद चे आयोजन केले आहे, तरी समस्त जनतेने तन-मन-धनाने साथ सहयोग द्यावा, असं आवाहन बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे जिल्हा संघटक अभय रंगारी यांनी केलं आहे.

To Top