110 कि.मी. पैकी 108 कि.मी. काम पूर्ण तर 84 किलोमीटरची हायड्रॉलिक चाचणी पूर्ण
सोलापूर : सोलापूर शहरासाठी महत्वाकांक्षी असलेले उजनी दुहेरी जलवाहिनी प्रकल्प पाहणी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केली. यावेळी आयुक्त यांनी पाकणी जलशुद्धीकरण केंद्रला भेट देऊन पंप हाऊसची माहिती घेतली. त्यानंतर उजनी येथील पंप हाऊस, उजनी दुहेरी पाईप लाईन, पाईप लाईन कोर्सिंग,पंपिंग मशीनरी, जॅकवेलची, बी.पी.टी. इत्यादी ची माहिती घेतली.
यावेळी स्मार्ट सिटी मुख्य तांत्रिक अधिकारी तथा कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे, जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील, हरीश व नदाफ मक्तेदार कंपनीचे प्रकल्प अधिकारी अरुण पाटील, स्मार्ट सिटीचे सहायक अभियंता उमर बागवान यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.
सोलापूर शहराला आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा करण्याच्या उद्दिष्टाने उभारण्यात येत असलेल्या समांतर जलवाहिनी प्रकल्पात 110 किलोमीटरपैकी 108 किलोमीटर पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित केवळ दोन किलोमीटरचे काम मार्चअखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
या प्रकल्पामुळे शहराला 170 एमएलडी क्षमतेचा पाणीपुरवठा शक्य होणार आहे. शहराच्या पाणीपुरवठा सुधारण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या समांतर जलवाहिनी प्रकल्पाला वेग आला असून, या प्रकल्पातील पंपगृहातील सर्व सहा पंपांची पाणी उपशाची चाचणी यशस्वी झाली आहे.
उजनी धरणावर उभारलेल्या नवीन पंपगृहात 1150 अश्वशक्ती क्षमतेचे सहा पंप बसविण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले. समांतर जलवाहिनीच्या टेंभुर्णी बाह्यवळण रस्त्याजवळील 1800 मीटर पैकी 1800 मीटर पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे.
सद्यस्थितीत ११० किलोमीटरपैकी 108 किलोमीटर पाइपलाइन टाकण्याचे काम तसेच 84 किलोमीटरची हायड्रॉलिक चाचणी पूर्ण झाली आहे. उर्वरित तीन किलोमीटर पाईप लाईनचे व उर्वरित काम स्मार्ट सिटीचे अधिकारी व महापालिका अधिकारी यांच्याशी समन्वय साधून मार्चअखेर पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली. या प्रकल्पामुळे सोलापूरकरांना नियमित पाणीपुरवठा होईल.