जग निर्माता, पालनकर्ता - अल्लाह अर्थात ईश्वर

shivrajya patra
मजान महिन्यात सर्वत्र कुरआन शरीफचे पठन होत असतांना त्यातील आशयाचे विवेचन (तफसीर)भाषांतरित करुन केले जाते. अरबी आयतांचा अर्थ आपल्या मातृभाषेत स्पष्ट केला जातो. प्रेषित हजरत पैगंबरांनी अल्लाहचे फरमान कुरआनच्या माध्यमातून लोकांपर्यत पोहोचविले. त्याला काय पसंत आहे व काय नापसंत आहे, माणसांनी कसे आचरण करावे व कसे करु नये, या सृष्टीतील सर्व चराचर गोष्टींचा निर्माता हा ईश्वर अर्थात अल्लाह आहे. त्याचेच नियंत्रण सर्वत्र आहे. 

तो ज्ञात,अज्ञात, दृश्य किंवा गुप्त सर्व गोष्टी जाणणारा आहे. त्याची उत्कृष्ट अशी अनेक नावे आहेत. प्रत्येक वस्तूला स्वरुप प्रदान करणारा व तिला मार्ग दाखविणारा तोच आहे. तो चिरंजीवी व चिरस्थायी आहे. माणसाला ऐकण्याची व पाहण्याची क्षमता व विचारी मन त्यानेच दिले आहे. जीवन व मृत्य देणाराही तोच आहे. 

पृथ्वी व तिच्या सर्व वस्तू त्याच्याच आहेत.सप्त आकाशांचा स्वामी व सर्वाधिकारी तोच आहे. त्याचा कोणीही भागीदार नाही. तोच सर्वसृष्टीचा पालनकर्ता आहे. आपल्या मनातील लपविलेल्या व प्रकट केलेल्या सर्व गोष्टी त्याला ज्ञात आहेत. 

त्याच्या अस्तित्वाखेरीज इतर सर्व काही नश्वर आहे. तोच सृष्टीचा प्रारंभकर्ता व पुनरावृती करणारा आहे. तो कधीही वचन भंग करीत नाही. तो सूक्ष्मदर्शी आहे. त्याला सर्व गोष्टींची खबर असते. सर्व स्तुती त्याच्यासाठीच आहे. तो बुध्दीवंत, माहितगार, परम कृपाळू व क्षमाशील आहे. प्रत्येक वस्तूवर त्याचे आधिपत्य आहे. तोच बनविणारा व तोच बिगडवणारा आहे. अपराधांना माफी देणारा व पश्चाताप स्विकारणारा तोच आहे. तो नजरेच्या चोरीला व ह्रदयातील रहस्यांनाही जाणणारा आहे. तो जेवढा क्षमाशील आहे तेवढाच यातनादायक शिक्षा देणाराही आहे तो सर्वसाक्षी आहे. तोच वाली व त्राता आहे. 

आपल्या भक्तांवर तो फार कृपाळू आहे . असत्याला नष्ट करतो. आशा आणि निराशा निर्माण करणारा तोच आहे. तो सृष्टीचा स्वामी आहे. हवे त्याला मुले देतो, हवे त्याला मुली देतो, हवे त्याला दोन्ही देतो व हवे त्याला वांझ बनवितो. तोच हसवितो, तोच रडवितो, तोच मरण व जीवन देतो, तोच धनवान बनवितो, संपत्ती प्रदान करतो, तोच भिकारी बनवितो.

अशा प्रकारे ईश्वराचे सामर्थ्य व अधिकारांचे वर्णन कुरआन मध्ये विविध ठिकाणी केलेले आहे. अल्लाहने माणसाला निर्माण केले, त्याची आराधना करण्यासाठी, एकमेकांना साह्य करण्यासाठी. अल्लाहने एक पुरुष आदम व एक स्त्री हव्वा निर्माण केली. या जगभरातील सर्व स्त्री पुरुष माणसे ही या जोडीची अपत्ये. लाक्षणिक अर्थाने सर्व एकमेकांचे नातेवाईकच.सर्व मानवजातीच्या रक्ताचा रंग एकच लाल. पण आजचे चित्र काय दिसते. माणसंच एकमेकांची वैरी झालेली दिसतात.(क्रमशः)

सलीमखान पठाण-9226408082.

To Top