रमजान महिन्यात अवतीर्ण झालेला कुरआन हा साक्षात अल्लाहने निर्माण केलेला दैवी ग्रंथ आहे. अल्लाहशिवाय कुणीही ईश्वर नाही व उपास्यही नाही, तो सर्वज्ञ आहे, तो मोठा उदार, क्षमाशील, दयावान व कृपाशील आहे. तो सर्वशक्तिमान व शासक आहे, तो सर्जन कर्ता व पालनकर्ता आहे,त्याचे दासांवर अनंत उपकार आहेत, अशा प्रकारची शिकवण कुरआन मध्ये दिली आहे.
जीवनासाठी आवश्यक तत्वज्ञान प्रस्तुत करतांना या सृष्टीचा निर्माणकर्ता अल्लाहच्या सर्व गुणवैशिष्ट्यांचा उल्लेख कुरआन मध्ये केला गेला आहे. वारंवार वाचन,पठन केल्याने त्यातील अर्थ आपल्याला उमजत असतो. अल्लाहची महती वर्णन करतांना अल्लाहच्या विविध रुपांचा उल्लेख कुरआन मध्ये केला गेला आहे.
अल्लाह हा असीम कृपावंत व दयावान आहे. मोबदल्याच्या दिवसाचा स्वामी आहे. पृथ्वी व आकाशाचा मालक आहे. पूर्व आणि पश्चिम,उत्तर व दक्षिण सर्व त्याचेच आहे. तोच आपल्या सर्वांचा पालनकर्ता आहे. तोच एकमेव परमदयालु, परम कृपाळू परमेश्वर आहे.
तोच चिरंतनजीवी असून तमाम सृष्टीचा भार सांभाळणारा तोच एकमेव ईश्वर आहे. सकल सृष्टींचा स्वामी, प्रतिष्ठा बहाल करणारा व अपमानित करणारा, सत्यवचनी व उपास्य तोच आहे.तो उपजिवीका देणारा, दया व कृपा करणारा, हानीपासून वाचवणारा, दासांवर सर्वाधिकार बाळगणारा खरा स्वामी तोच आहे. दाणे व बीज फोडून अंकुर काढणारा व निशापटल फाडून प्रातःकाल करणाराही तोच आहे.जीवन व मरण देणारा तोच आहे. त्याच्या शिवाय ईतर कोणीही ईश्वर नाही.
आकाश व पृथ्वीतील सर्व दृश्य, अदृश्य वस्तू त्याच्याच अधिकार क्षेत्रात आहेत. सर्व मामले त्याच्याकडेच रुजू होतात. तो क्षमा करणारा ही आहे व कठोर शिक्षा देणाराही आहे. तो प्रकट व अप्रकट अशा सर्व गोष्टींचा ज्ञाता, महान व सर्व स्थितीत उच्च असा आहे. त्याच्या निर्णयावर कुणीही पुनर्र्दृष्टी करणारा नाही व त्याला हिशोब घेण्यास ही विलंब लागत नाही.
सृष्टीतील सर्व गुप्त सत्यांचे ज्ञान त्यालाच आहे, तो सर्व काही करु शकतो.त्याचा कोणीही पुत्र नाही व त्याच्या बादशाहीत कुणीही भागीदार नाही,तोच सर्वांचा स्वामी आहे. अशा प्रकारे अल्लाहची महती कुरआन मधील विविध सुरए मधून वर्णन केलेली आहे.
माणसाने कसे वागावे, त्याच्या प्रत्येक कृत्याची कल्पना अल्लाहला आहे.भले ते कृत्य उजेडात करो किंवा सात पडदे लावून अंधारात करो तो सर्वज्ञानी आहे, म्हणून प्रत्येकाने अल्लाहची भिती बाळगून आपले जीवन सद् मार्गाने जगावे, वाममार्गांचा त्याग करावा, अशा प्रकारची शिकवण कुरआन मध्ये देण्यात आली आहे. (क्रमशः)
सलीमखान पठाण-9226408082.