शहर गुन्हे शाखेच्या कामगिरीत घरफोडी-चोरीचे ०३ गुन्हे उघड
सोलापूर : मोठ्या मशिनरी गॅस कटरच्या सहाय्याने कट करुन ते टेम्पोमध्ये भरुन विक्री करीता सोलापूरमध्ये आणलेल्या तिघांना शहर गुन्हे शाखेच्या तपास पथकानं ताब्यात घेतले. त्या त्रिकुटाकडं कसून चौकशी करता, ते साहित्य एम.एस.सी. बँकेने सिल केलेल्या कुंभारी येथील शारदा सुत मिलमधून चोरून आणल्याची कबुली दिलीय. २६ फेब्रुवारी रोजी जोडबसण्णा चौकाजवळील जमखंडी पुल येथे पो.उप.नि. मुकेश गायकवाड व त्यांच्या तपास पथकाच्या हाती लागले.
त्यांच्या ताब्यातून ASHOK LEYLAND कंपनीचा टेम्पो व टेम्पोमधील ०४,६०,१२५ रुपयांचा मुद्देमाल भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम ३५ (३) प्रमाणे ताब्यात घेतला. मुद्देमालासंबंधी अधिक माहिती घेतली असता, त्याबाबत वळसंग पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०५ (a), ३३१(३), ३३१ (४) अन्वये, गुन्हा दाखल असून या कारवाईमुळे हा गुन्हा उघडकीस आला आहे.
व्यवसायाने सिक्युरीटी इंचार्ज असलेला शुभम लक्ष्मण पाटील (वय-२६ वर्षे, रा. यशवंत नगर घर नं. ५४ बाळे सोलापूर), गॅस वेल्डींग व्यावसायिक आरिफ नुरुद्दीन सय्यद (वय-३० वर्षे, रा. राहुल गांधी झोपडपट्टी, पाच्छा पेठ, सोलापूर) आणि टेंपो चालक इरफान बाबु मुच्छाले वय ३२ वर्षे, रा. ५८५ बी जुना विडी घरकुल, कुंभारी) यांना ताब्यात घेतलंय. 
तसेच ०५ मार्च रोजी पो.उप.नि.मुकेश गायकवाड व त्यांच्या पथकास एक महिला चिप्पा भाजी मार्केटच्या बाजुला, सार्वजनिक रस्त्यावरुन चोरीची मालमत्ता विक्री करण्याकरीता अशोक चौकाकडे पायी चालत येणार असल्याची माहिती मिळाली. त्याअनुषंगाने फरजाणा अब्बास शेख (वय- ४२ वर्षे, व्यवसाय गृहीणी रा. ४८४/३ गोदुताई विडी घरकुल, कुंभारी सोलापूर) या महिलेस महिला पोलीस अंमलदाराकरवी ताब्यात घेऊन, तिची अंगझडती घेतली असता, तिच्या ताब्यातून १,०७,५०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागीने हस्तगत करण्यात आले.
त्याबाबत सदर बझार पोलीस ठाण्याकडील भा.द.वि.सं. कलम ३७९ आणि भा. न्या. सं. कलम ३०३ (२) अन्वये, दाखल ०२ गुन्हे उघडकीस आले.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. दिपाली काळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक मुकेश गायकवाड व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, वाजीद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, अर्चना स्वामी आणि चालक बाळु काळे यांनी पार पाडली.
