सोलापूर : नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिक्षण घेतानाच प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधी विविध शासकीय, निमशासकीय संस्था तसेच कंपन्यांमध्ये मिळणार आहे. त्यासाठी ऑन जॉब ट्रेनिंग (ओजीटी) व आंतरवासिता अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे, त्याचा फायदा रोजगारक्षम पिढी घडण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी केले.
शनिवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील प्लेसमेंट सेल विभाग यांच्यातर्फे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली फॅकल्टी कॅपॅसिटी बिल्डिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. दामा हे बोलत होते. यावेळी कुलसचिव योगिनी घारे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे समन्वयक मनीष पाटील, डॉ. श्रीराम राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्लेसमेंट सेल विभागाचे समन्वयक डॉ. अनिल घनवट यांनी केले.
प्र-कुलगुरू प्रा. दामा म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली असून यामुळे अभ्यासक्रमात बदल झाले आहेत. वर्गातील पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षणही यामुळे मिळणार आहे. ओजीटी व आंतरवासिता सारख्या उपक्रमाचा विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी निश्चितच फायदा होणार आहे. यामुळे विकसित भारतासाठी देखील याचा निश्चितच परिणामकारक लाभ होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मनीष पाटील म्हणाले, विविध उद्योग व कंपन्यांना कुशल मनुष्यबळाची गरज भासते. आता नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची व्यवस्था केल्याने त्याचा निश्चितच कंपन्यांना फायदा होणार आहे. त्याचबरोबर कुशल मनुष्यबळ देखील तयार होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी डॉ. दीपक ननवरे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास अतुल बक्षी, किरण भिसे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यांनी डॉ. रोहिणी शिवशरण यांनी केले तर डॉ. श्रीराम राऊत यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले.
फोटो ओळी
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील प्लेसमेंट सेल विभाग यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कुलसचिव योगिनी घारे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे समन्वयक मनीष पाटील, प्लेसमेंट सेल विभागाचे समन्वयक डॉ. अनिल घनवट व डॉ. श्रीराम राऊत छायाचित्रात दिसत आहेत.