छळवादाने होरपळलेल्या मुक्ताई आणि कुटुंबाचा जीवन प्रवास उलगडणारा 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' चित्रपट १८ एप्रिलला प्रदर्शित : दिग्पाल लांजेकर

shivrajya patra

सोलापूर : सामाजिक छळवादाने होरपळून निघालेल्या विठ्ठलपंतांच्या पोटी निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान व मुक्ताबाई या विभूती जन्मास आल्या, ज्ञानसाधना, जीवनाविषयी अनासक्ती, कठोर वैराग्य हीच ज्ञानेश्वरादी भावंडांना वारसा म्हणून लाभलेली संपत्ती होती. वैयक्तिक आत्मोद्धाराला लोकोद्धाराची जोड देऊन आत्मकल्याण आणि विश्वकल्याण साधणाऱ्या मुक्ताई आणि त्यांच्या कुटुंबाचा जीवनप्रवास उलगडून दाखविणारा 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' हा चित्रपट १८ एप्रिलला प्रदर्शित होत असल्याची माहिती दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी मंगळवारी दुपारी एका पत्रकार परिषदेत दिली.

'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' या चित्रपटाची प्रस्तुती ए.ए. फिल्म्स ही नामांकित वितरण संस्था करीत आहे. या चित्रपटात आव्हानात्मक संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत अभिनेता तेजस बर्वे तर संत मुक्ताईची भूमिका नेहा नाईक दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती रेश्मा कुंदन थडानी यांनी केली असून लेखन स्वतःचे असल्याचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी प्रारंभी म्हटले.

यापूर्वी संत ज्ञानेश्वर यांच्या जीवनावर प्रभात ने प्रदर्शित केला होता, ८४ वर्षानंतर 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' हा चित्रपट घेऊन मराठी सिनेरसिकांपर्यंत येत आहोत. 'संत मुक्ताई' च्या अलौकिक स्वरूपात, मातेचे वात्सल्य, कारुण्याचा परमोत्कर्ष, भगिनीचा अवखळपणा, ज्ञानाचा निरंतर वाहणारा झरा यांसारख्या अनेक गोष्टी एकाच वेळी प्रकटलेल्या पाहायला मिळतात. मुक्ताई संत ज्ञानेश्वरांच्या प्रेरणास्थान होत्या. 

वारकरी परंपरेत या चारही भावंडांचे कार्य अलौकिक आहे. हे श्रेष्ठत्व सहज मिळालेले नव्हते, तर त्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना मोठ्या दिव्यातून जावे लागले. त्यात सर्वांत लहान असलेल्या मुक्ताई ला खूप मोठी जबाबदारी स्वतःवर घ्यावी लागली. मुक्ताई यांचे साहित्य-विचार परखड, जाज्वल, मार्गदर्शक आहेत. ज्ञानी संतांना आपल्या प्रखर विद्वत्तेने आणि अधिकारवाणीने गुरुमंत्र देऊन ही शलाका तळपती झाली. त्यांच्या आठवणींचा, अभंगांचा त्याच्या ध्येयाचा लख्ख उजेड मात्र आजही मागे उरला आहे. त्यांचे ताटीचे अभंग हे संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी निर्मिती मागची प्रेरणा होती. मुक्तईंनी निभावलेल्या याच माता, भगिनी, गुरू, मैत्रीण अशा विविध भूमिकांचे पदर 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' या चित्रपटातून उलगडणार आहेत, असं दिग्दर्शक लांजेकर यांनी सांगितले.

या चित्रपटात संत निवृत्तीनाथांच्या भूमिकेत अक्षय केळकर तर संत सोपानकाकांची भूमिका सूरज पारसनीस यांनी साकारलीय. यासोबत समीर धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, मनोज जोशी, योगेश सोमण, स्मिता शेवाळे, सचिन देशपांडे, अभिजीत शवेतचंद्र, नुपूर दैठणकर, आदिनाथ कोठारे यांच्यासुद्धा चित्रपटात भूमिका आहेत.

यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली, मात्र सध्याच्या घडीला ऐरणीवर असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या प्रश्नावर न बोलणे पसंत केले. 

देहरूपाने संपले तरी कार्य रूपाने संजीवन असणाऱ्या स्त्री-पुरुष भेदापलीकडे जगणे शिकविणाऱ्या संत मुक्ताईचा खडतर आणि भक्तीरसाने परिपूर्ण जीवन प्रवास आजच्या पिढीला ज्ञात व्हावा, यासाठी 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' हा वेगळा प्रयत्न केल्याचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी शेवटी सांगितले.

या पत्रकार परिषदेस तेजस बर्वे, नेहा नाईक आणि अजय पूरकर उपस्थित होते.

... यांनी सांभाळली 'ही' जबाबदारी !

संगीताची जबाबदारी अवधूत गांधी, देवदत्त बाजी यांनी सांभाळली आहे. छायाकन संदीप शिंदे तर संकलन सागर शिंदे, विनय शिंदे याचे आहे. कला दिग्दर्शन प्रतीक रेडीज तर ड्रोन आणि स्थिर छायाचित्रण प्रथमेश अवसरे यांचे आहे. रंगभूषेची जबाबदारी अतुल मस्के तर वेशभूषेची जबाबदारी सौरभ काबळे यांनी सांभाळली आहे. नृत्यदिग्दर्शन किरण बोरकर तर ध्वनी आरेखन निखिल लांजेकर यांचे आहे. पार्श्वसंगीत शंतनू पांडे यांनी दिले आहे. साहसदृश्ये बब्बू खन्ना यांची तर सहनिर्माते सनी बक्षी आहेत,कार्यकारी निर्मात्या केतकी गद्रे अभ्यंकर आहेत, असंही दिग्पाल लांजेकर यांनी म्हटले. 

To Top