टी बी मुक्त ग्राम पंचायत पुरस्कारासाठी जिल्ह्यातील १९९ ग्राम पंचायती पात्र; २३ रजत पुरस्काराच्या मानकरी

shivrajya patra

सोलापूर : जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधत सोमवारी, २४ मार्च रोजी टी बी मुक्त ग्राम पंचायत पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या बहारदार सोहळ्यात जिल्ह्यातील १९९ ग्राम पंचायती टी बी मुक्त ग्राम पंचायत पुरस्कारसाठी पात्र ठरल्या. त्यातील २३ ग्राम पंचायती रजत पुरस्काराच्या मानकरी ठरल्या तर उर्वरित १७६ ग्राम पंचायती कास्य पुरस्कार साठी पात्र ठरल्या.

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आरोग्य विभागातील विविध विभाग व जिल्हा क्षयरोग कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने टी बी मुक्त ग्राम पंचायत पुरस्कार वितरण सोहळा सोमवारी, श्री छत्रपती शिवाजी महाराज, रंगभवन सोलापूर येथे आयोजित करण्यात आला होता.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली उपजिल्हाधिकारी सोलापूर, सहायक संचालक कुष्ठरोग सोलापूर. जिल्हा क्षयरोग अधिकारी, अति जिल्हा आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, सोलापूर जिल्हा लेखा व्यवस्थापक, सोलापूर. जिल्हा क्षयरोग केंद्र सोलापूर येथील सर्व अधिकारी/कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच/ग्रामसेवक व इतर आरोग्य अधिकारी/कर्मचारी यांचा सन्मान कार्यक्रम पार पडला.

यावेळी सोलापूर जिल्ह्यातील १,०२५ ग्रामपंचायत पैकी १९९ ग्राम पंचायती टी बी मुक्त ग्राम पंचायत पुरस्कारसाठी पात्र ठरल्या त्या पैकी २३ ग्राम पंचायती रजत पुरस्कार साठी पात्र ठरल्या व उर्वरित १७६ ग्राम पंचायती काश्य पुरस्कार साठी पात्र ठरल्या.

जागतिक क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार असून याचा प्रसार श्वसनाव्दारे होतो. जगातील एकूण क्षयरुग्णांपैकी २५ टक्के क्षयरुग्ण हे भारतात आढळून येतात. भारतातील क्षयरुग्णांपैकी १० टक्के रुग्ण महाराष्ट्रात आढळून येतात.

महाराष्ट्राची सद्यस्थितीः- राज्यात सन २०२४ मध्ये २,३०,५१५ क्षयरुग्ण आढळून आले आहेत. सन २०२५ करिता केंद्रीय क्षयरोग विभागाकडून राज्यास २ लाख ३० हजार क्षयरुग्ण शोधण्याचे उद्दिष्ट दिलेले आहे. राज्यात माहे जानेवारी व फेब्रुवारी २०२५ दरम्यान ३९,७०५ क्षयरुग्ण आढळले आहेत.

सोलापूर जिल्ह्याची सद्यस्थितीः- जिल्ह्यात सन २०२४ मध्ये ३,३४८ क्षयरुग्ण आढळून आले आहेत. सन २०२५ करिता राज्य क्षयरोग विभागाकडून सोलापूर जिल्ह्यास ३,२०० क्षयरुग्ण शोधण्याचे उद्दिष्ट दिलेले आहे. जिल्ह्यात माहे जानेवारी व फेब्रुवारी २०२५ दरम्यान ६,९८ क्षयरुग्ण आढळले आहेत.

जागतिक स्तरावरील शाश्वत विकास ध्येयानुसार सन २०३० अखेर क्षयरोगाचे दुरिकरण करणे अपेक्षित आहे. परंतु प्रधानमंत्री मोदी यांनी सन २०२५ अखेर देशातून क्षयरोगाचे दुरिकरण करण्याचे महत्त्वकांक्षी लक्ष्य ठेवलेले आहे. त्याअनुषंगाने देशात राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

जागतिक स्तरावर दरवर्षी २४ मार्च हा दिवस क्षयरोगाविषयी जनजागृती करण्यासाठी "जागतिक क्षयरोग दिन" म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून जागतिक स्तरावर मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक असलेल्या क्षयरोगाकडे सर्वाच्या एकत्रित सहकार्याने लक्ष वेधण्यात आलं आहे.

क्षयरोगाच्या महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना जागतिक क्षयरोग दिनानिमीत्त दरवर्षी एक घोषवाक्य प्रसारित करते.

"होय! आपण क्षयरोग निश्चित संपवू शकतो" प्रतिज्ञा करा, तरतूद करा, सेवा द्या"

* उपरोक्त घोषवाक्यानुसार राज्यातून क्षयरोग संपविण्यासाठी आपण सर्वानी खालील ३ प्रकारची कार्यवाही करण्यावर विशेष भर देण्याची आवश्यकता आहे,

१) प्रतिज्ञा करा:- सर्व भागीदारांनी क्षयरोग संपविण्यासाठी प्रतिज्ञा घेणे.

२) तरतूद कराः- नाविण्यापूर्ण उपक्रम राबविणे, क्षयरोगविषयक सेवा सहज उपलब्ध करुन देण्यासाठी त्रुटी दूर करणे आणि प्रगतशील संशोधन करणे, यासाठी निधीची तरतूद करणे.

३) सेवा द्या:- क्षयरुग्णांच्या फायद्यासाठी प्रतिज्ञेनुसार व केलेल्या तरतूदीनुसार त्यांना दर्जेदार सेवा देणे.

* सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २०२५ पर्यंत क्षयरोग दुरीकरण करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.


To Top