रमजान महिन्यातील शेवटचा तिसरा खंड काल सायंकाळपासूनच सुरू झाला आहे. या कालखंडात शब ए कद्र ही महत्त्वपूर्ण रात्र येणार आहे. या रात्रीत जास्तीत जास्त प्रार्थना करून आपल्या खात्यात पुण्य संचय करण्याची नामी संधी प्रत्येकाला उपलब्ध झालेली आहे.
रमजान महिना पूर्णत्वास जाताना ज्यांनी पूर्ण महिन्याचे योग्य प्रकारे पालन केले, अशांना ईदचा खरा आनंद प्राप्त होतो. ईदची तयारी देखील आता सुरू झाली आहे. आपले नातेवाईक, सभोवताली राहणारे आपले शेजारी, परिचित या सर्वांची विचारपूस करून ईदचा आनंद प्रत्येकाला कसा प्राप्त होईल, याकरिता आपले योगदान देण्यासाठी प्रत्येक जण आतुर झालेला आहे.
रमजान महिना ही उम्मते मोहम्मदीला मिळालेली एक अनमोल अशी भेट आहे. या महिन्याचे जास्तीत-जास्त योग्य प्रकारे पालन करून आपल्या जीवनामध्ये एक आदर्श जीवन प्रणाली आत्मसात करण्याची संधी या निमित्ताने प्राप्त झालेली आहे. तिचा सदुपयोग करून घेण्याची आवश्यकता आहे.
रोजच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या कारणास्तव समाजातील अनेक घटकांचा एकमेकांशी संबंध येतो. खेड्यात किंवा शहरात वेगवेगळ्या व्यवसायाच्या निमित्ताने विविध धर्मीय नागरिक वेगवेगळे उद्योग व्यवसाय करीत असतात. गरजेनुसार प्रत्येकाचा एकमेकाशी संबंध येतो.
ज्यावेळी माणसाला गरज असते, त्यावेळी तो समोरच्या व्यक्तीची जात, धर्म, पंथ पाहत नाही, तर आपली गरज कशी पूर्ण होईल, याकडे त्याचा जास्त ओढा असतो. अनेक लोक जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आपली मैत्री जपतात. वर्षानुवर्षांचे हे ऋणानुबंध आज खूपच दृढ झालेले आहेत. अचानकपणे ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही काळासाठी आकाश झाकोळले जाते, तसे आपल्या या समाजात एकात्मतेला तडा देण्यासाठी काही घटक अधून मधून डोके वर काढतात, पण आपल्या एकोप्यामुळे अशा लोकांचे मनसुबे धुळीस मिळतात.
गेली तीन आठवडे प्रसिद्ध झालेल्या या रमजान लेखमालेबद्दल अनेक वाचकांनी प्रत्यक्ष फोन करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या व धार्मिक व सामाजिक सलोख्यासाठी दैनिक 'लोक आवाज' च्या आज पर्यंतच्या योगदानाचा गौरवपूर्ण असा उल्लेख केला आहे.
इस्लामी संस्कृती,इस्लाम धर्माबद्दलची माहिती, रीतीरिवाज याबद्दल खूप काही माहिती या माध्यमातून प्राप्त झाल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या. गेली सत्तावीस वर्ष सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून ही लेखमाला चालवली. वाचकांकडे गेल्या अनेक वर्षाची या लेखमालेची कात्रणे उपलब्ध आहेत. हे या लेखमालेच्या लोकप्रियतेचे प्रतीक आहे.
आजपर्यंत आपण सर्व वाचकांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद.
आपल्या या बहुभाषिक आणि बहुधार्मिक राज्यामध्ये धार्मिक सलोखा राखण्याचे कार्य या निमित्ताने दैनिक 'जनतेचा आवाज' केले आहे. त्याबद्दल या परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. (क्रमशः)
सलीमखान पठाण-9226408082.