आवडीच्या क्षेत्रात कौशल्य साध्य करावे : मा. कुलगुरु लेफ्ट. जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांचे प्रतिपादन
सोलापूर : यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आवडीच्या क्षेत्रात कौशल्य साध्य करुन शिक्षण घ्यावे असे प्रतिपादन विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प यांनी केले.
विद्यापीठातर्फे सोलापूर येथे अश्विनी रुरल वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्रात ‘कुलगुरु कट्टा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) समवेत मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. सचिन मुंबरे, विद्यापीठाच्या वैद्यकीय विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. विठ्ठल धडके, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, अश्विनी रुरल वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिश्ठाता डॉ. सुहास कुलकर्णी, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. देवेंद्र पाटील, उपकुलसचिव एन. व्ही. कळसकर व्यासपीठावर उपस्थित होते.
विद्यापीठाचे कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर यांनी सांगितले की, स्वयंपूर्ण शिक्षणाकडे विद्यार्थ्यांनी अधिक लक्ष केंद्रीत केले पाहिजे. गुणवत्ता व विकासाचा पाया भक्कम करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. संशोधन आणि नवीन कल्पनांचा प्रत्यक्ष वापर होण्यासाठी विविध उपक्रम विद्यापीठाकडून सुरु करण्यात आले आहेत. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांनी करावा. क्रीडा व कला क्षेत्रातही आरोग्य शिक्षणातील विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यसाठी महाविद्यालयांनी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. नवीन शिक्षण पध्दतीत निर्देशित केलेल्या कृती अंवलंबिण्यासाठी शिक्षकांनी व तज्ज्ञांनी पुढाकार घेऊन काम करणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविण्यासाठी जिद्द व शिस्त प्रत्येकाने कायम ठेवावी, असे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, आरोग्य क्षेत्रात सर्व विद्या शाखांच्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या समान संधी आहेत. कौशल्य गुण विकसित करून त्यात निपुणता मिळवणे आवश्यक आहे. त्यसाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनंसपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी परीक्षा पध्दती, संशोधन, विद्यापीठाच्या विविध योजना आदींबाबत कुलगरुंना प्रश्न विचारून संवाद साधला. डॉ. देवेंद्र पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सहायक कुलसचिव संदीप राठोड यांनी विद्यापीठाच्या समर इंटर्नशिप प्रोग्रामविषयी माहिती दिली तसेच मेंटल प्रिपरेशन फॉर कॉन्सस्ट्रेशन विषयावर श्रीमती मानसी हिरे यांनी मार्गदर्शन केले.