एशियन सेंटर आणि गाझीउद्दीन अकादमीचा उपक्रम
विसंवाद संपवण्यासाठी हिंदू-मुस्लिम भगिनींनी इफ्तारच्या माध्यमातून साधला संवाद
सोलापूर : महिला सक्षमीकरणासाठी अशा वेगवेगळ्या सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून महिलांचं एकत्रिकरण करणे गरजेचे आहे. महिलांमध्ये एकमेकांविषयी विश्वास वाढला की, सामाजिक एकजुटीला बळ मिळेल, असं प्रतिपादन डॉ. अस्मिता बालगावकर यांनी केले.
भारतीय समाजात एकत्र राहताना प्रत्येक समाज घटकाची एकमेकांना माहिती व्हावी, एकमेकांची जगण्याची मूल्ये, संस्कृती आणि विचारधारा कळावी, भारतीय समाजामध्ये काही गोष्टीबाबतीत असणारा विसंवाद संपवावा, या हेतूने एशियन सेंटर फॉर सोशल स्टडी आणि गाझीउद्दीन अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने 'इफ्तार संवाद' कार्यक्रमाचे आयोजन सोशल हायस्कूल येथे करण्यात आले होते.
यावेळी प्रा. आसमा खान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या डॉ. अस्मिता बालगावकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शकुंतला सूर्यवंशी होत्या.
प्रारंभी आस्मा खान यांनी इफ्तारचे महत्व, इस्लाममध्ये रमजान महिन्यांमध्ये केल्या जाणाऱ्या उपासना यांची माहिती दिली.
भारतीय समाजातील विविध घटकांमध्ये संवाद निर्माण झाल्यास वर्तमान स्थितीतील अनेक आव्हानांना आपल्याला तोंड देता येऊ शकते. त्यामुळे येत्या काळात दिवाळी, ख्रिसमस अशा वेगवेगळ्या उत्सवांच्या माध्यमातून वेगवेगळ्या घटकांतील महिलांची संवाद साधला पाहिजे, असंही डॉ. अस्मिता बालगावकर यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा शकुंतला सूर्यवंशी यांनी मुस्लिम महिलांना रमजान ईदच्या शुभेच्छा देऊन इफ्तार संवादचे महत्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमित्रा पवार यांनी तर प्रास्ताविक शबाना काझी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आसिफ इकबाल, मेहबूब कोथिंबीरे, महेजबीन सरफराज, सरिता मोकाशी, मुईज अहमद, अल्ताफ कुडले आदींनी परिश्रम घेतले.
फोटो ओळी : 'इफ्तार संवाद' मध्ये डॉ. अस्मिता बालगांवकर, डॉ. आसमा खान आणि शकुंतला सूर्यवंशी आदी उपस्थित होते.