सोलापूर : महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, दक्षिण सोलापूर च्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ हास्य कवी अशोक नायगांवकर यांचा मिश्किली आणि गप्पा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यानगर येथे शनिवारी 8 मार्च रोजी हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
ज्येष्ठ हास्य कवी अशोक नायगावकर यांनी महिलांवरील विविध कवितांचे सादरीकरण केले. स्वयंपाक घरातील गृहिणी ते विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असलेली महिला अशा सर्वच स्तरावर आधारित कवितांचे सादरीकरण करून नायगावकरांनी हास्याचे फवारे उडवले, त्याला उपस्थित महिलांनीही मोठी दाद दिली.
प्रारंभी महाराष्ट्र साहित्य परिषद, दक्षिण सोलापूर शाखेच्या अध्यक्षा रेणुका महागावकर यांनी प्रास्ताविक केले. महिला दिन साजरा करताना महिलांसाठी कवितांचा कार्यक्रम करण्यामागचा हेतू आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या कार्याचा आढावा त्यांनी आपल्या प्रास्ताविकात मांडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मसापच्या पृथा हलसगीकर यांनी केले, तर आभार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला महिलांची मोठी गर्दी होती. दरम्यान अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या उपनगरीय शाखेचे तिसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विजय साळुंखे यांचा कवी अशोक नायगावकरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, जितेश कुलकर्णी, अमोल धाबळे, विनायक होटकर, वर्षा कत्ते, नसीमा पठाण, अण्णासाहेब कोतली, मोहन सोनी, पद्माकर कुलकर्णी, गिरीश दुनाखे,मारुती कटकधोंड, रसिका बडवे, विशाखा कुमठेकर, उर्मिला जोशी,कृपा देशमुख, वंदना ताटे, विजय शिंदे, अनुजा पत्की, मृणाल पत्की, आशा जाधव, नीता जेऊरकर, दीपक जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.