संत विचार शिक्षणातून दिले पाहिजेत : राज्यस्तरीय वारकरी संमेलनात ठराव

shivrajya patra

वारकरी संप्रदायाला अध्यात्म व संस्काराचा मोठा वारसा : ह भ प निरंजननाथ योगीजी महाराज

सांगोला येथे अखिल भाविक वारकरी मंडळाचे पहिले राज्यस्तरीय वारकरी संमेलन संपन्न

अखिल भाविक वारकरी मंडळ तालुका तेथे वारकरी भवन उभारण्याचा निर्धार

सांगोला(प्रतिनिधी) : वारकरी संप्रदायाला खूप मोठी परंपरा आहे.

 ज्ञानदेवे रचिला पाया I

तुका झालासे कळसII

भागवत संप्रदायाचा पाया मजबूत असल्याने आज विज्ञान युगात ही अध्यात्म यशस्वी ठरत आहे. वारकरी संप्रदायात अध्यात्म व संस्काराचा मोठा ठेवा आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा भगवान शंकरापासून तसेच नाथ संप्रदायापासून सुरू झाली आहे. संताकडे शब्दाची संपत्ती असते. महाराष्ट्र भूमीत चार संप्रदाय आहेत. वारकरी संप्रदाय हा जीवनात आनंद देणारा आहे. गाथेचे वाचन सर्वात प्रथम पांडुरंगाने केले आहे. रामकृष्ण हरी हा वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा यापुढेही अखंडपणे चालत राहणार आहे, असे विचार श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आळंदीचे प्रमुख विश्वस्त ह. भ. प.निरंजननाथ योगी यांनी व्यक्त केले.

सांगोला येथे भाविक वारकरी मंडळाचे पहिले राज्यस्तरीय वारकरी संमेलन रविवारी, 09 मार्च रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 04 वा. दरम्यान पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृतीभवन सांगोला येथे  पार पडले. या कार्यक्रमात  ह.भ. प. निरंजननाथ योगी बोलत होते. श्री संत नामदेव महाराज यांचे वंशज ह. भ. प. माधव नामदास हे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. 

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून वासकर फडाचे फडप्रमुख ह. भ. प. गोपाळ (अण्णा) वासकर, अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे, ह.भ. प. भागवत चवरे, आध्यात्मिक आघाडी शिवसेना प्रदेशाध्यक्ष ह. भ. प. अक्षय भोसले, प्रदेशाध्यक्ष ह.भ. प. जोतीराम चांगभले, किसन कापसे (प्रदेश उपाध्यक्ष), मोहन शेळके (प्रदेश सचिव), बळीराम जांभळे (राष्ट्रीय सचिव ), पंढरपूर विभाग जिल्हाध्यक्ष ह. भ. प. ज्ञानेश्वर भगरे, जिल्हा उपाध्यक्ष ह. भ. प. बिरा बंडगर, महिला जिल्हाध्यक्षा पार्वती आवताडे, ह. भ. प. तानाजी बेलेराव, नाशिक जिल्हाध्यक्ष ह. भ. प. अण्णासाहेब आहेर, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ह. भ. प. शिवाजी वागवेकर, सांगली जिल्हाध्यक्ष ह. भ. प. लक्ष्मण नवलाई,धाराशीव जिल्हाध्यक्ष ह. भ. प. महादेव सस्ते, परभणी जिल्हाध्यक्ष ह. भ. प. सुनिल कुलकर्णी, पुणे जिल्हाध्यक्ष ह. भ. प. कृष्णदेव बेलेराव, सोलापूर महिला जिल्हाध्यक्षा शुभांगी शेळके, नांदेड जिल्हाध्यक्ष गोपीनाथ केंद्रे महाराज, संजय पवार (शहर अध्यक्ष), प्रा. गोपाळ लोंढे (सह जिल्हाध्यक्ष), किरण श्रीचिप्पा (सह अध्यक्ष), अविनाश जाधव, संगीता अवताडे  तसेच वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर, वारकरी जिल्हाध्यक्ष व महिला पदाधिकारी तसेच माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, दैनिक दामाजी एक्सप्रेसचे संपादक दिगंबर भगरे उपस्थित होते.

सांगोला येथे  वारकरी संप्रदायाचे राज्यस्तरीय संमेलन माजी नगरसेवक सतीश सावंत यांनी आयोजित केले होते. यावेळी ह.भ.प. सुधाकर इंगळे यांनी वारकरी संप्रदायाविषयी महत्वपूर्ण माहिती उपस्थित वारकर्‍यांना दिली. गाव तेथे 'भजनी मंडळ व हरिपाठ' तसेच तालुका तेथे 'वारकरी भवन' तर जिल्ह्याच्या ठिकाणी 'राज्यस्तरीय वारकरी संमेलन' घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी पार्वती अवताडे यांनी वारकरी संमेलनात महिला भाविक वारकर्‍यांचा मोठा सहभाग असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. सोलापूर जिल्ह्याच्या महिला वारकरी जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. या पदाला न्याय देण्यासाठी व भागवत धर्माचा प्रचार करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असेही अवताडे यांनी सांगितले. 

प्रसिद्ध भारुडकार चंदा तिवाडी, मारोळी मठाचे मठपती संदेश भोसले आदी वारकर्‍यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, पूर्वीप्रमाणे आजचे कीर्तन दिशा दाखवणारे राहिले नसून त्यात मनोरंजनाचा भाग वाढला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या विचारामुळे आपल्याला दिशा मिळाली असून, आपणही भक्तीमार्गाच्या दिशेने पुढे जायला हवे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी वारकरी संमेलनास भेट देऊन या संमेलनासाठी शुभेच्छा देत जवळा येथे आध्यात्मिक नगरी उभा करण्याचा संकल्प जाहीर केला. जवळा येथे अडीच एकर जागेमध्ये लायब्ररी, स्मारक, वारकरी संप्रदाय प्रशिक्षण, निर्माण करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

भविष्यात वारकरी संप्रदायासाठी महत्त्वपूर्ण व चांगले निर्णय घेतले जातील, असे सांगत अध्यात्मामुळे हे जग यशस्वीपणे पुढे वाटचाल करीत असून विज्ञान युगातही अध्यात्माला विशेष असे महत्त्व असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी ह.भ. प. सुधाकर महाराज इंगळे यांनी महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष, माजी नगरसेवक सतीश सावंत यांची अखिल भाविक वारकरी मंडळ पंढरपूर विभागाच्या उपाध्यक्षपदी निवड केली आणि त्यांचा सन्मान केला. 

सांगोला येथे संपादक पत्रकार व माजी नगरसेवक सतीश सावंत यांनी हे राज्यस्तरीय वारकरी संमेलन आयोजित केले होते. या कार्यक्रमासाठी अखिल भाविक वारकरी मंडळाचे सर्व पदाधिकारी व मंडळे उपस्थित होती. संमेलनासाठी राज्यभरातील अनेक जिल्ह्यातून वारकरी उपस्थित होते. अंबिकादेवी मंदिर चौक ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती भवनपर्यंत ग्रंथदिंडी, पालखी काढण्यात आली. 

कार्यक्रमस्थळी सर्वप्रथम विठ्ठल रुक्मिणी प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन प्रमुख वारकरी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक वारकरी बांधवांचे सहकार्य लाभले. तसेच ज्ञानेश्वर  जिल्हा अध्यक्ष माऊली भगरे, जिल्हा सहअध्यक्ष बिरा बंडगर यांनी परिश्रम घेतले.

महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष महिला व पुरुष आदी मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते. दरम्यान  दु. 2.00 वा. वारकरी मंडळ पदाधिकारी परिचय भेट, दु. 2.30 वा. महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष व महिला पदाधिकारी मनोगत व्यक्त केले. 4.30 वा समारोप व पसायदानाने सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्तविक ह. भ. प. सुधाकर इंगळे यांनी केले. सूत्रसंचालन ह. भ. प. संजय पाटील तर ह. भ. प. जोतीराम चांगभले यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल भाविक वारकरी मंडळाच्या सर्व पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.

चौकट :

या संमेलनामध्ये घेण्यात आलेले ठराव :

1) कलाकार मानधन समितीमध्ये प्रत्येक जिल्ह्यात भाविक वारकरी मंडळाचा एक प्रतिनिधी असावा.

2) कलाकार मानधान निवड करताना 50 टक्के वारकरी असावेत.

3) माघवारीला आषाढी वारीप्रमाणे प्रत्येक दिंडीला मानधन सुरु करावे.  

4) प्रत्येक जिल्ह्यात एक वारकरी भवन उभे करावे.

5) शालेय शिक्षणामध्ये संत वाड:मय जास्त असावे.

6) भाविक वारकरी मंडळ पदाधिकारी जिथं सप्ताह संयोजक असतील तिथं कीर्तनामध्ये इतर गीतांना बंदी असावी.

7) वारकरी शिक्षण घेतलेल्या मुलांना शैक्षणिक प्रवेशासाठी 5 टक्के मार्क गृहीत धरावेत.

8) महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्रामध्ये मांसविक्री बंदी व दारू बंदी असावी. तीर्थक्षेत्राच्या 3 कि. मी. आत बंदी असावी असे विविध प्रकारचे ठराव संमत केले.

To Top