' खून का बदला खून ' प्रसंग चित्रपटात नव्हे वास्तवात; निर्घृण खून प्रकरणात 08 तासात आरोपी गजाआड

shivrajya patra


'सोलापूर : कधी काळी हिंसाप्रधान चित्रपटात, ' खून का बदला खून ' हा डॉयलाग बहुचर्चित असायचा, जवळच्या माणसाच्या हत्येचा बदला हत्येने घेतला गेल्याचं दृश्य त्याच्या जोडीला ठरलेलं असायचं, अशीच वास्तव घटना रविवार पेठेतील जोशी गल्लीत सोमवारी मध्यरात्री घडली. ०६ वर्षापूर्वी भावाच्या हत्येचा बदला तुकाराम उर्फ रॉबट पांडुरंग सरवदे (वय-30 वर्ष) याच्या हत्येत झाला. जोडभावी पेठ पोलिसांनी या गुन्ह्यात उत्तम प्रकाश सरवदे याला अवघ्या ०८ तासात गजाआड केलंय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, रविवार पेठ येथील जोशी गल्लीत सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास तुकाराम उर्फ रॉबट पांडुरंग सरवदे हा ३० वर्षीय तरुण जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती डायल 112 वरून जोडभावी पेठ पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्यानुसार घटनास्थळी उध्दव महाराज सरवदे यांचे घरासमोर तुकाराम उर्फ रॉबट सरवदे जखमी अवस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यास उपचारासाठी तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, त्याचा मृत्यू उपचारापूर्वीच झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

पोलिसांनी या हत्या प्रकरणात तपासाला गती दिली असता, तुकाराम उर्फ रॉबर्ट सरवदे याने 2019 मध्ये उत्तम सरवदे याचा भाऊ सागर प्रकाश सरवदे याची हत्या केली होती. त्याचा रोष मनात धरुन बदला घेण्याचे उद्देशाने उत्तम याने सोमवारी रात्री 11.50 वा सुमारास जोशी गल्ली येथील उध्दव महाराज सरवदे यांच्या घरासमोर तुकाराम उर्फ रॉबट सरवदे याला हाताने व लाथा-बुक्क्याने जबर मारहाण करुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारुन पळून गेला असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार मृताचा भाऊ विष्णू यांच्याकडून प्राप्त झालेली माहिती अन् दाखल फिर्यादीनुसार उत्तम प्रकाश सरवदे याच्याविरुध्द भारतीय न्याय संहिता कलम-103(1), प्रमाणे मंगळवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपासात जोडभावीपेठ पोलीसांना मिळालेल्या गुप्त बातमीदाराद्वारे आरोपीबाबत माहीती प्राप्त झाली. 

या माहितीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी राहण्यास असलेल्या नागरिकांकडे चौकशी करुन तसेच गोपनिय बातमी मिळवून तांत्रिक पध्दतीचा वापर करुन अधिक चौकशी करुन या गुन्ह्यात आरोपी उत्तम प्रकाश सरवदे (वय-35 वर्ष, रा. रविवार पेठ, जोशी गल्ली, सोलापूर) यास शिताफीने पकडून ताब्यात घेत, हा गंभीर गुन्हा घडल्यापासून 08 तासाचे आत उघड करण्यात जोडभावी पेठ पोलिसांना यश आले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (विभाग-01) प्रताप पोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती शबनम शेख, पो. हे. कॉ. 404/इम्रान बशीर शेख, पो. कॉ./1565 दादासाहेब सरवदे, पो. कॉ. 613/ स्वप्निल उत्तम कसगावडे, पो.कॉ. 1917/यश नागटिळक, पो.कॉ. 1624/मल्लिनाथ स्वामी, पो.कॉ.912/विजयकुमार महादेव कोष्टी यांनी पार पाडली. पोलीस निरीक्षक शबनम शेख या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.


To Top