सोलापूर : येथील सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा अवघ्या 01 तासाचे आत उघडकीस आणण्यात गुन्हे प्रकटिकरण पथकाला यश आलंय. या आंतरराज्य टोळीकडून गुन्ह्यातील 22 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा 1,76,000 रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आलाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आकांक्षा सोसायटीतील रहिवासी श्रीमती रेखा तानाजी हेवळे यांच्या घराजवळ 12 मार्च रोजी सायंकाळी 06.00 वा. आलेल्या अनोळखी एक महिला व पुरुषापैकी महिलेने त्यांच्या घरात जाऊन, घरी पुजा घालुन तुमचे सर्व दु:ख दुर करते, सर्व करणी-भानामती काढते वगैरे म्हटले.
त्यावेळी पुजा करण्याचा बहाणा करुन श्रीमती रेखा हेवळे यांच्याकडे असलेले सुमारे 1,76,000 रुपये किंमतीचे 22 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने तिने आणलेल्या पणत्यामध्ये पुजेकरीता ठेवले. त्यानंतर त्या पणत्या घरात वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात गुंतवून ते सोन्याचे दागीने चोरुन नेल्याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305,3 (5) अन्वये गुरुवारी 13 मार्च रोजी रात्री गुन्हा दाखल झाला.
या गुन्ह्यासंबंधी कोणताही धागा-दोरा नसताना पोलीस हवालदार राजेश चव्हाण, सागर सरतापे, पोलीस शिपाई सागर गुंड, सोमनाथ सुरवसे यांनी काढलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तसेच यातील फिर्यादी जबाबातील संशयित महिलेचे वर्णनावरुन ती महिला व तिच्या समवेत असलेल्या संशयित पुरुषाचा शोध घेत रात्री रेल्वे स्थानकात पोहोचले.
तेथे संशयित महिला व पुरुष मिळून आल्याने त्यांच्याकडे गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने विचारपूस करता, त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. नगिना मो. आरिफ (वय-37 वर्षे, रा. बी-106 रामपार्क, लोनी देहात गाझीयावाद उत्तर प्रदेश) आणि आविद रसीद (वय-55 वर्षे, 930 संजय कॉलनी, मोहन नगर, गाझियाबाद उत्तर प्रदेश) अशी रोपींची नावे आहे. ते सराईत आरोपी असून चोरी करुन दिल्लीकडे जाण्याच्या तयारीत असताना त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या
या आरोपींकडे गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेला 24 हजार रुपयांचे एक सोन्याचे-काळे मणी असलेले गंटण, 80 हजार रुपये किंमतीचं सोन्याचे नेकलेस, 20 हजार रुपये किंमतीची एक नक्षीकाम असलेली सोन्याची लेडीज अंगठी आणि 52 हजार रुपयांचे कानातील एक जोड झुमके असा 1.76 लाख रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहाय्यक पोलीस (आयुक्त विभाग-2) यशवंत गवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, सहा. फौजदार औदुंबर आटोळे, पो.हे.कॉ. संतोष पापडे, पो.हे.कॉ. शहाजहान मुलाणी, पो.हे.कॉ. सागर सरतापे, पो.हे.कॉ. राजेश चव्हाण, म.पो.हे.कॉ. ज्योती बेटकर, पो.कॉ. सागर गुंड, सोमनाथ सुरवसे, अनमोल लट्टे, उमेश चव्हाण, हणमंत पुजारी, राम भिंगारे आणि परशुराम म्हेत्रे यांनी पार पाडली.