सोलापूर : महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या एकत्रित महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे काम करणारे आरोग्य मित्रांच्या मागण्यांवर सोमवारपर्यंत कोणताही निर्णय न झाल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील सर्व आरोग्य मित्र मंगळवारी, 18 फेब्रुवारीपासून संपावर जात आहेत. सोलापूरमधून पूर्ण सोलापूर जिल्ह्यातील आरोग्यमित्रांनी राज्यव्यापी बेमुदत संपात सहभागी होत पाठिंबा दिलाय.
महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या एकत्रित महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे काम करणारे आरोग्य मित्रांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व आरोग्यमित्र 12 फेब्रुवारी 2025 पासून बेमुदत संपावर जाणार होते. परंतु राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी 07 फेब्रुवारी रोजी दुपारी आरोग्य मित्रांच्या मागण्याविषयी चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली.
या बैठकीमध्ये राज्य आरोग्य हमी सोसायटीचे सीईओ म. अण्णासाहेब चव्हाण, डेप्युटी सीईओ म.विनोद बोंद्रे,तसेच सहाय्य संस्थेचे (TPA) पदाधिकारी आणि महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी.एल. कराड, उपाध्यक्ष एल. आर. राव, कॉ. राहुल गायकवाड, कॉ. गणेश शिंदे, कॉ. किरण ढमढेरे, कॉ. वैशाली साखरे, कॉ. संदीप फणसे हे उपस्थित होते.
या बैठकीमध्ये आरोग्य मित्रांच्या विविध मागण्यांवर चर्चा झाली. यामध्ये किमान वेतन, वार्षिक वेतनवाढ, आरोग्य मित्रांच्या रजासह इतर मागण्यांची सविस्तर सकारात्मक चर्चा झाली. सहाय्य संस्थेचे (TPA) पदाधिकारी यांनी आरोग्य मित्र मागण्यासंदर्भात दहा दिवसांची मुदत मागितली व राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी सहमती दर्शवली.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी सांगितले की, राज्याच्या सर्व जिल्ह्यातील आरोग्य मित्र पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून मुदतवाढ देऊ, असं सांगितले. त्यानंतर राज्यातील सर्व आरोग्यमित्र कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन या मीटिंगमध्ये दहा दिवसांची वेळ वाढवून देण्याचा निर्णय झाला.
महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष विष्णू गायकवाड, फरदिन मुल्ला, सुशील पवार, समीर शिंदे, विकास माळवदकर, रीमा लोंढे, सपना धनवे, इम्रान हिंगणीकर यावेळी उपस्थित होते.