सोलापूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त छत्रपती प्रतिष्ठान, बोरामणी यांच्या वतीने प्रसिद्ध इतिहासकार व शिवव्याख्याते प्रा.नितीन बानगुडे पाटील यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आल्याची माहिती छत्रपती प्रतिष्ठानचे मार्गदर्शक प्रा. डॉ. राज साळुंखे यांनी दिली.
छत्रपती प्रतिष्ठान, बोरामणीच्या वतीने दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. बोरामणीच्या छत्रपती प्रतिष्ठान ची भव्य मिरवणूक सर्वदूर प्रसिद्ध आहे.
समाजात वैचारिक प्रबोधन व्हावे, समाजाला एक नवी दिशा मिळावी, शिवरायांचा धगधगता इतिहास आपल्या नव्या पिढीला समजावा या भावनेने यावर्षीपासून छत्रपती प्रतिष्ठान, ने मिरवणूक न काढता समाज प्रबोधनपर कार्यक्रम राबविण्यावर भर दिला आहे. त्याचाच भाग म्हणून बुधवारी, २६ फेब्रुवारी रोजी शिव व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे.
बोरामणी येथील एस.व्ही.सी.एस हायस्कूल भव्य प्रांगणात सायंकाळी ०५ वा. व्याख्याते प्रा. बानगुडे- पाटील यांचं व्याख्यान होत आहे. प्रारंभी अक्कलकोट विधानसभेच्या आमदारपदी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची अन् बोरामणी गावच्या सरपंचपदी सौ. अरुणा साळुंखे यांची निवड झाल्याबद्दल शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांच्या शुभहस्ते भव्य नागरी सत्कार प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती शिवजन्मोत्सवाचे अध्यक्ष अमित मोरे व नाना भोसले यांनी दिली.