जिल्ह्यात डाळिंब व केळी फळ पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असल्याने यावरील प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करावेत
प्रत्येक शासकीय कार्यालयात सात सुत्री कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी
जिल्हा पालक सचिव संजय सेठी यांनी सोलापूर विमानतळ ला भेट देऊन पाहणी केली व माहिती जाणून घेतली
सोलापूर : सोलापूर जिल्हा हा वस्त्रोद्यगांमध्ये संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. चादरी, टॉवेल व स्कूल युनिफॉर्मचे हब सोलापूर होत असून परदेशातही मोठ्या प्रमाणावर निर्यात होत आहे. त्यामुळे वस्त्रोद्योगाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळावी, यासाठी सोलापूर येथे टेक्स्टाईल पार्क निर्माण करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करावा. यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून टेक्स्टाईल पार्क मंजूर करून घेऊ, असे प्रतिपादन परिवहन व बंदरे, गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव तथा सोलापूर जिल्ह्याचे पालक सचिव संजय सेठी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित सर्व शासकीय विभागाचा आढावा पालक सचिव संजय सेठी यांनी घेतला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शितल उगले-तेली, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांच्यासह सर्व संबंधित शासकीय विभाग प्रमुख उपस्थित होते.


01 एप्रिल 2019 पूर्वी जे शासकीय वाहने खरेदी करण्यात आलेली आहे, त्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट, 31 मार्च 2025 पूर्वी बसवून घेणे बंधनकारक आहे. तसेच सर्व खाजगी वाहनांनाही बंधनकारक असल्याची माहिती सेठी यांनी यावेळी दिली. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या कामकाजाची माहिती दिली तर महापालिका आयुक्त शितल उगले तेली यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात येत असलेल्या कामांची तसेच वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी येत असलेल्या अडचणींची माहिती देऊन त्या सोडवण्याच्या दृष्टीने सहकार्य करण्याची मागणी त्यांनी केली. शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. संजीव ठाकूर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देण्यात येत असलेल्या आरोग्यविषयक सोयी सुविधांची माहिती दिली.
प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी मुख्यमंत्री यांचा सात सुत्री कार्यक्रमांतर्गत शंभर दिवसात प्रत्येक शासकीय विभागाने करावयाच्या कामकाजाची माहिती देऊन आज रोजीपर्यंत करण्यात येत असलेल्या कामाविषयी सविस्तर माहिती पीपीटी द्वारे सादर केली.
सोलापूर विमानतळाला भेट- सोलापूर जिल्ह्याचे पालक सचिव संजय शेट्टी यांनी शासकीय विभागांचा आढावा घेतल्यानंतर होडगी रोड येथील सोलापूर विमानतळाला भेट देऊन विमानतळाची पाहणी केली व कामकाजाची माहिती घेतली. तसेच विमान सेवा सुरू करण्याच्या अनुषंगाने येत असलेल्या अडचणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद तसेच विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक बंजारा व श्रीमती अंजनी यांच्याकडून जाणून घेतल्या. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार हेही उपस्थित होते.