गुन्हे शाखेच्या कामगिरीत ८५.७ ग्रॅम सोन्याचे तर १८४.५ ग्रॅम चांदीचे दागिने हस्तगत
सोलापूर : धार्मिक कार्याच्या निमित्ताने नातलगाच्या घरी आलेल्या जवळच्या नातेवाईकाने 'हाथ की सफाई' चा प्रताप केला. हुडको परिसरातील सोनी नगरात, 22 जानेवारी रोजी हा खळबळजनक प्रकार घडलाय. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात अनिल गोलेकर (वय-३३ वर्षे) याच्या ताब्यातून ८५.७ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि१८४.५ ग्रॅम चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले असून शहर गुन्हे शाखेच्या तपास पथकाने त्यास गजाआड केलंय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मोदी हुडको परिसरातील सोनी नगरात राहणारे श्रीकांत बाबू गोलेकर यांचा चुलत भाऊ अनिल शंकर गोलेकर यांचे घरी २२ जानेवारी२०२४ रोजी धार्मिक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आलेले नातेवाईक श्रीकांत आणि अनिल गोलेकर यांच्या राहत्या घरात घरी ये-जा करीत होते. त्यामुळे श्रीकांत व कुटुंबियांनी त्याचे घरास कूलूप न लावता, घर उघडेच ठेवले होते.
या कार्यक्रमादरम्यान २२ जानेवारी रोजी सकाळी १०:०० ते रात्रौ १०:३० वा. च्या दरम्यान अज्ञात चोरट्यानं श्रीकांत याच्या घरात प्रवेश करुन, बेडखाली ठेवलेली पत्र्याची पेटी व त्यामध्ये ठेवलेले सोने व चांदीचे दागिने चोरुन नेले. या प्रकरणी श्रीकांत याच्या फिर्यादीनुसार सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा भा. न्या. सं. २०२३ कलम ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे, सपोनि शैलेश खेडकर व त्यांचे पथकातील अंमलदार, यांनी गुन्ह्याचे घटनास्थळास भेट दिली होती. हा गुन्हा करण्याच्या आरोपीच्या पध्दतीवरुन, सपोनि शैलेश खेडकर यांना जवळच्याच कोणीतरी माहितगार व्यक्तीने गुन्हा केला असल्याबाबत दाट संशय होता. त्यामुळे गुन्हा उघडकीस आणणे अत्यंत कठिण झाले होते.
अशा स्थितीत सपोनि शैलेश खेडकर व पथकाने गुन्हा करण्याच्या पध्दतीवरुन, गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळविली. त्या अनुषंगाने तांत्रिक माहितीचे अत्यंत कौशल्याने विश्लेषण केले. या माहितीवरुन गुन्हा करणारा संशयित, हा फिर्यादी श्रीकांत गोलेकर याचा जवळचा नातलग, अनिल गोलेकर (वय-३३ वर्षे, धंदा मजुरी रा. ब्लॉक नं. १२९, सोनी नगर, मोदी हुडको सोलापूर) हा असल्याची खात्री केली. त्यानंतर त्यास सपोनि शैलेश खेडकर व पथकाने सापळा लावून तो दागिने विक्री करण्यासाठी जात असताना, मुद्देमालासह ०७ फेब्रुवारी रोजी मोदी स्मशानभूमीजवळून ताब्यात घेतले.
त्याच्या अंगझडतीत, त्याने श्रीकांतच्या घरातून चोरलेले ८५.७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे व १८४.५ वजनाचे चांदीचे दागिने असा सरकारी किंमतीनुसार ४,९२,५२० रुपयांचा ऐवज हस्तगत केला. हा गुन्हा अत्यंत कौशल्याने उघडकीस आणला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. दिपाली काळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे स.पो.नि. शैलेश खेडकर व पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद रजपुत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, बाळासाहेब काळे तसेच सायबर पो. स्टेशनकडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडली.