मंगल सोहळ्यात अक्षता पडण्याआधी झालेल्या मारहाणीत आतेबहिण जखमी; नववधूसह दोघी आरोपी

shivrajya patra

सोलापूर : मंगल कार्यालयात मंगल कार्य पार पडतात, अशी सामान्य धारणा असते. या धारणेला छेद देणारा मारहाणीचा प्रकार मोहोळ तालुक्यातील पाटकुल येथील सौभाग्य मंगल कार्यालयात शुक्रवारी दुपारी घडलाय. लग्नकार्यात आशीर्वाद देण्यासाठी आलेली आतेबहिण दिपश्री तात्यासाहेब भोसले (वय- 20 वर्षे) असं जखमीचं नांव आहे. मंगल सोहळ्यात अक्षता पडण्याआधी झालेल्या मारहाण प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात नववधूसह दोघींविरुध्द गुन्हा दाखल झालाय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, जुळे सोलापुरातील इंडियन मॉडेल स्कूलनजिकच्या मेलोडी अपार्टमेंटमधील रहिवाशी असलेले भोसले कुटुंबिय, संजिवकुमार रामचंद्र बोराडे यांची मुलगी वैष्णवी हिचं लग्नकार्य असल्याने शुक्रवारी, पाटकूल येथील सौभाग्य मंगल कार्यालयात गेले होते. भोसले कुटुंबातील सौ. राजश्री भोसले अन् त्यांचे भाऊ संजिवकुमार बोराडे, संतोषकुमार बोराडे यांच्यात वडिलोपार्जीत जमिनीच्या कारणावरुन वाद आहे.

जमिनीचा वाद सुरू असताना विवाह सोहळ्यात उपस्थित राहून विवाह शृंखलेत बांधले जात असलेल्या नववधू-वराला आशिर्वाद देण्यासाठी आलेली बहिण, सौ. राजश्री भोसले यांची, त्यांचा भाऊ संजिवकुमार यांनं भेट घेतली. जमिनीच्या वादातून निर्माण झालेल्या कटूतेसंबंधी बहिणीची माफीही मागितली. दरम्यान पाठीमागून आलेल्या भाची गायत्री हिने आत्या राजश्रीस पाठीत हाताने मारले. 

त्यावेळी दिपश्री गायत्रीला, 'तु माझे आईला का मारले,' म्हणून विचारत असताना, वैष्णवीनं तिच्या पाठीमागून येऊन शिवीगाळी करीत तिच्या डोक्यात काचेची बाटली मारली. त्या प्रहारानं दिपश्रीला जखम होऊन डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. लागलीच सौ. राजश्री भोसले यांनी मुलगा सुदर्शन आणि जखमी मुलगी दिपश्रीला सोबत घेऊन मोहोळ पोलीस स्टेशन गाठले. 

जखमी दिपश्रीला चक्कर येऊ लागल्यामुळे पोलीसांनी दवाखाना यादी देऊन मोहोळ ग्रामीण रुग्णालयात उपचारास पाठविले. त्यानंतर दिलेल्या फिर्यादीनुसार जखमीच्या मामाच्या मुली गायत्री संजिवकुमार बोराडे व वैष्णवी संजिवकुमार बोराडे (दोघी रा. एम 64 सुंदरम् नगर, विजापूर रोड, सोलापूर) यांच्याविरुद्ध भा.न्या. सं कलम 115(2), 118(1), 352, 3 (5), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस नाईक/556 गोरे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

To Top