संविधानानुसार देशाचा कारभार चालतो, त्याची रचना कोणी बदलू शकत नाही: ॲड. राजपूत

shivrajya patra

सोलापूर विद्यापीठात संविधान गौरव महोत्सव अंतर्गत व्याख्यान 

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगात सर्वश्रेष्ठ भारतीय संविधानाची निर्मिती केली. संविधानानुसार देशाचा, राज्याचा कारभार चालतो, त्याची रचना कोणी बदलू शकत नाही, असं स्पष्ट मत जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांनी व्यक्त केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्यावतीने संविधान गौरव महोत्सव अंतर्गत 'आपले संविधान' या विषयावर आयोजित व्याख्यानात जिल्हा सरकरी वकील ॲड. राजपूत हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.  प्रकाश महानवर हे होते.

यावेळी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी केले.

ॲड. राजपूत म्हणाले की, संविधान हा देशाचा कणा आहे. संविधानात केलेल्या तरतुदीनुसारच देशाचा कारभार चालतो. भारतीय नागरिकांना देखील मूलभूत हक्क व अधिकार संविधानानुसार प्राप्त झाले आहेत. प्रत्येक नागरिकांचे देखील कर्तव्य आहे की, आपल्याला मिळालेल्या अधिकार व कर्तव्यांची जाणीव करून घेतले पाहिजे. याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी तसेच प्रत्येक नागरिकांनी करायला हवे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. याचबरोबर विविध कायदे व कलमांची माहिती देखील ॲड. राजपूत यांनी यावेळी दिली. 

कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगात सर्वात महान संविधानाची निर्मिती केली. संविधान ही कायद्याची जननी असून यामुळे देशातील शिस्त व संस्कृती टिकली आहे. प्रत्येकांसाठी कायदे समान आहेत. प्रत्येकाला समान जगण्याचा अधिकार व हक्क संविधानाने दिलेले आहे. अतिशय सुस्पष्ट आणि महान भारतीय संविधान असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. 

या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले तर डॉ. राजेंद्र वडजे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. 

फोटो ओळी 

सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात 'आपले संविधान' या विषयावर जिल्हा सरकरी वकील ॲड. प्रदीपसिंग राजपूत यांचे व्याख्यानप्रसंगी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे आदी छायाचित्रात दिसत आहेत.

To Top