नगरसेवक पुत्रासह इतर ठेवीदारांकडून तब्बल 15 कोटी 40 लाख रुपयांची फसवणूक
सोलापूर : शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे व मोबदला मिळवून देण्याचे आमिष दाखवून नगरसेवक पुत्र आशिष अशोक पाटील यांच्यासह इतर ठेवीदारांकडून तब्बल 15 कोटी 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील निवृत्ती मारुती पैलवान या आरोपीस सोलापूर येथील विशेष सत्र न्यायाधीश जे. जे. मोहिते यांनी ३ दिवसाची पोलीस कोठडी मंजूरचे आदेश पारित केले.
या घटनेची थोडक्यात हाकिकत अशी की, जुळे सोलापुरातील न्यू संतोष नगर येथील राहणारे नगरसेवक पुत्र आशिष अशोक पाटील यांचा विश्वास संपादन करून त्यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास सांगून त्यांना ५ टक्के दराने मोबदला देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी रोख व ऑनलाईनच्या माध्यमातून एकूण 80 लाख रुपये घेऊन त्यांना ठरल्याप्रमाणे कोणताही मोबदला न देता त्यांचा विश्वासघात करून फसवणूक केल्याप्रकरणी आशिष अशोक पाटील यांनी विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने आरोपी निवृत्ती मारुती पैलवान व त्यांची पत्नी सुरेखा निवृती पैलवान (दोघे राहणार 105, आर्यश रेसिडेन्सी, एसआरपीएफ कॅम्प जवळ, विजापूर रोड, सोलापूर) यांच्याविरुद्ध भा.द.वि कलम 420, 406, 34 अन्वये गुन्हा दाखल झालेला होता. सदर गुन्ह्याची व्याप्ती ही मोठी असल्याने सदर गुन्ह्याचा तपास गुण्याचा तपास हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला होता.
या गुन्ह्याच्या तपासांमध्ये आरोपी निवृत्ती पैलवान यांनी एकूण 124 ठेवीदारांकडून शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याचे व मोबदला मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 15 कोटी 40 लाख रुपयाची फसवणूक झाल्याची बाब तपासात निष्पन्न झाली.
या फसवणुकीची रक्कम हे मोठे असल्याने व अनेक गुंतवणूकदारांना त्यांनी फसवणूक केल्याने महाराष्ट्र ठेवीदारांचे हित संबंधाचे संरक्षण कलम ३ प्रमाणे कलम वाढ करून आरोपीस शुक्रवारी, 21 फेब्रुवारी रोजी सोलापूर येथील विशेष न्यायाधीश एमपीआयडी कोर्ट यांच्या समक्ष हजर केले असता न्यायाधीश जे. जे. मोहिते यांनी पोलिसांना प्रस्तुत गुन्ह्याचा तपास करण्यास आरोपीस ३ दिवस पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश पारित केला.
या प्रकरणांमध्ये मूळ फिर्यादीच्या वतीने अॅड. रियाज एन. शेख, सरकार पक्षातर्फे अॅड. माधुरी देशपांडे तर आरोपीतर्फे अॅड. विद्यावंत पांढरे यांनी काम पाहिले.