बांधकाम कामगार योजनेत सावळा गोंधळ ! सहा. कामगार आयुक्तांच्या हकालपट्टीची मागणी

shivrajya patra

सोलापूर/सोहेल शेख : राज्य शासन व इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या वतीने, राज्यातील बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेत गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेला भ्रष्टाचार व सावळ्या गोंधळास जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड सर्वस्वी जबाबदार असून, त्यांची ताबडतोब हकलपट्टी करा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे निवेदन देऊन जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आलीय.

जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात, महाराष्ट्र शासन व इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळ असे संयुक्त पणे राज्यातील बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना आर्थिक, सामाजिक, आरोग्य व सर्वांगीण सक्षम बनविण्यासाठी गरीब बांधकाम कामगारांसाठी सुमारे 28 योजना लागू केल्या आहेत. या सर्व योजना प्रत्येक जिल्ह्याच्या सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली चालतात, असे असताना सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड हे कामगारांना सहजासहजी या योजनांचा लाभ मिळावा, सरकारच्या तसेच महामंडळाच्या उद्देशाला काळीमा फासत आहेत.

बांधकाम कामगाराची नोंदणी प्रक्रिया, किट वाटप, पेटीवाटप व क्लेम प्रकरणे अशा अनेक लाभांमध्ये सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त हे आपल्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार व आपल्या खाजगी दलांना हाताशी धरून या चांगल्या योजनेला बाधा निर्माण करण्याचे काम करीत आहेत. 

यापेक्षा गंभीर बाब म्हणजे सहाय्यक कामगार आयुक्त गायकवाड हे कार्यालय मध्ये कधीही उपस्थित राहत नाहीत. कामगार व कामगार प्रतिनिधी यांना भेटण्यास गेले असता, त्यांच्या कार्यालयामार्फत, 'साहेब पुण्याच्या ऑफिसला गेले आहेत, साहेब हायकोर्टात आहेत, साहेब मंत्रालयात आहेत, व ज्या दिवशी कार्यालयात असतात दुपारी बारा ते एकच्या दरम्यान येतात व अचानक नाहीसे होतात, असे त्यांनी कामावर रुजू होऊन एक ते दीड वर्ष झाले आहे, तेव्हापासून ते असेच प्रकार करतात' असा या संघटनेचा आरोप आहे.

सोलापूर जिल्हा हा कामगारांचा जिल्हा मानला जातो, पण कामगार आयुक्त ठिकाणावर राहत नाही. ते कामगारांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा प्रश्न निर्माण करतात. या प्रकरणाची आपण सखोल चौकशी करून, अशा कामगार विरोधी आयुक्तांना निलंबित करून सहकार्य करावं, असंही नमूद करण्यात आलं आहे.

विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना सोहेल शेख, वैशाली बनसोडे, रेखा आडकी, विठ्ठल कुराडकर, राधिका मीठा, प्रशांत जक्का, सुनिता चिलबेरी, सविता दासरी, ज्योती चिलवेरी, माधवी गौडा, भाग्यलक्ष्मी त्रिमल, गीता जक्का, रेखा कुराडकर, रेणुका मच्छा, पद्मा मॅकल यांची उपस्थिती होती. 

छायाचित्रात : निवासी जिल्हाधिकारी मनीषा कुंभार, यांना सहाय्यक कामगार आयुक्त, यांची हकालपट्टी करण्याच्या मागणीचे निवेदन देताना विष्णू कारमपुरी, सोहेल शेख, यांच्यासह बांधकाम कामगार दिसत आहेत.

To Top