Type Here to Get Search Results !

पंचायत समिती कार्यालयात ५० हजारांची स्विकारली लाच; कनिष्ठ अभियंता एसीबीच्या जाळ्यात

 

सोलापूर : माळशिरस तालुक्यातील फळवणी ग्रामपंचायत येथे शासकिय पूर्ण केलेले इलेक्ट्रीक कामाचे बिल मिळाल्यावर पिलीव ग्रामपंचायत अंतर्गत केलेल्या रोडलाईटच्या कामाच्या बिलाच्या अनुषंगाने पाठपुरावा करत असताना तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची लाचेची मागणी करून ५० हजार रुपयांची लाच स्विकारताना कनिष्ठ अभियंता शशिकांत सयाजी चौगुले यांना पंचायत समिती कार्यालयात एसीबी पुणे विभागाच्या पथकाने गुरुवारी रंगेहाथ पकडलंय.

या खळबळजनक घटनेची थोडक्यात माहिती अशी की,  तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे शासकिय इलेक्ट्रिकल कामे करण्यासाठीचा शासकीय परवाना असून, त्यासाठी त्यांनी एक फर्म स्थापन केलीय. या फर्मद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत येणारी सर्व प्रकारची इलेक्ट्रिक कामे करण्यात येत असतात. या फर्मला मिळणारी शासकीय इलेक्ट्रिक कामे करण्यासाठी तसेच केलेल्या कामाच्या बिलासाठीचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदाराच्या पत्नीने तक्रारदाराला अधिकारपत्र दिलेले आहे.

तक्रारदाराने फर्मच्या वतीने माळशिरस तालुक्यातील फळवणी ग्रामपंचायत येथे शासकिय इलेक्ट्रीक काम पूर्ण केलेले आहे. त्याबाबतचे बिल त्यांना मिळाले आहे. तसेच त्यांनी पिलीव ग्रामपंचायत अंतर्गत केलेल्या रोडलाईटच्या कामाच्या बिलाच्या अनुषंगाने पाठपुरावा करत असताना तक्रारदार कनिष्ठ अभियंता शशिकांत चौगुले यांच्याकडे गेले.

त्यांनी तक्रारदाराकडे फळवणी ग्रामपंचायत अंतर्गत केलेल्या कामाचे बिल मिळवून देण्यासाठी केलेल्या मदतीच्या मोबदल्यात ३४,००० रुपये व पिलीव ग्रामपंचायत हद्दीत केलेल्या कामाच्या बिलासाठी करीत असलेल्या मदतीच्या मोबदल्यात ३३,००० रुपये असे  ६७,००० रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे दिली.

तक्रारदार यांच्या प्राप्त तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता, लोकसेवक शशिकांत चौगुले यांनी तक्रारदार यांनी केलेल्या दोन ग्रामपंचायतीच्या हद्दीत केलेल्या इलेक्ट्रिकल कामाचे बील मंजुरीसाठी केलेल्या मदतीच्या मोबदल्यात तसेच तक्रारदाराने इतरत्र केलेल्या कामाचे बील भविष्यात मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडे १,००,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली.

गुरुवारी, १६ जानेवारी रोजी लोकसेवक शशिकांत चौगुले यांनी तक्रारदार यांच्याकडून लाच मागणी रकमेपैकी ५०,००० रुपयांची लाच माळशिरस पंचायत समिती कार्यालयात स्विकारली असता, त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. लोकसेवक शशिकांत चौगुले यांचेविरुद्ध माळशिरस पोलीस स्टेशन, सोलापूर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

ही कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे (ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, पुणे) व अपर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे (ला.प्र.वि. पुणे) यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

.... नागरिकांना आवाहन ....

लोकसेवक शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम (एजंट) हे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास त्याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे कार्यालयास खालील नमूद क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे (ला.प्र.वि. पुणे) यांनी केले आहे.

१) अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे दुरध्वनी क्रमांक ०२० २६१२२१३४, २६१३२८०२, २६०५०४२३

२) व्हॉट्स अॅप क्रमांक मुंबई ९९३०९९७७००

३) ई-मेलआयडी पुणे dyspacbpune@mahapolice.gov.in

४) वेबसाईट www.acbmaharashtra.gov.in

५) ऑनलाईन अॅप तक्रार www.acbmaharashtra.net.in