Type Here to Get Search Results !

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाची लोकाभिमुख कामगिरी; १ हजार ५२८ बदल अहवाल निर्णित

सोलापूर :  सार्वजनिक न्यास नोंदणी कर्यालय, सोलापूर तर्फे सन २०२४ मध्ये विविध लोकाभिमुख योजना राबविण्यात आल्या आहेत.  यामध्ये एकूण १ हजार ५२८ बदल अहवाल निर्णित करण्यात आले. धर्मादाय आयुक्त , मुंबई यांचे निर्देशानुसार घेण्यात आलेल्या तीन विशेष मोहिमे अंतर्गत १ हजार ८२ बदल अहवाल निर्णित करण्यात आले असल्याची माहिती धर्मादाय उपायुक्त प्रविण कुंभोजकर यांनी दिली.

या निर्णित केलेल्या बदल अर्जाचे आदेश डिजीटल स्वाक्षरीने धर्मादाय संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले. जेणेकरुन नागरीकांना निर्णित केलेल्या बदल अर्जाचे आदेश कुठेही वाचणे सहज शक्य झाले आहे. तसेच ६९३ संस्था तथा न्यास ऑनलाईन प्रणालीतून नोंदणी करण्यात आले. संस्था तथा न्यास नोंदणीचे ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. विविध स्वरुपाच्या प्राप्त तक्रारींचे न्यास नोंदणी निरीक्षक यांचेमार्फत चौकशी करुन ३३० प्रकरणे निर्गमीत झाली.

प्रामुख्याने संस्था आणि न्यास नोंदणीचे सर्व कामकाज ऑनलाईन पध्दतीने सुरु करण्यात आले आहे. तसेच गणेश उत्सव, नवरात्र उत्सव आणि इतर उत्सवाकरिता तात्पुरत्या परवानग्या देणेची प्रक्रिया देखील सोलापूर येथे प्रथम संपूर्णतः ऑनलाईन पध्दतीने करण्यात आली आहे.

या अंतर्गत एकूण ९०९ तात्पुरत्या परवानग्या देण्यात आल्या. यासाठी अर्ज ऑनलाईन भरण्याची सोय असल्याने व तात्पुरत्या परवानग्या अर्जदारांच्या ई-मेल वर प्राप्त होत असल्याने अर्जदारांना न्यास नोंदणी कार्यालयात एकदाही येणेची गरज भासली नाही.

तसेच शासनाचे विधी आणि न्यास विभागाच्या धोरणानुसार लवकरच सर्व अभिलेख संगणीकीय करण्याचे कामकाज सुरु होणार असून त्यासाठीची प्राथमिक तयारी न्यास नोंदणी कार्यालयात युध्द पातळीवर सुरू आहे.

विधी व न्याय मंत्री यांचे निर्देशानुसार न्यास नोंदणी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली धर्मादाय इस्पितळामार्फत गतवर्षी एकूण १८२ मोफत आरोग्य शिबीरांच्या यशस्वी आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये सुमारे ८ हजार २१९ रुग्णांनी लाभ घेतला. त्याचप्रमाणे कारागृहात दोन आरोग्य शिबीरांची आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात सुमारे ७२८ कैद्यांना आरोग्य शिबीराचा लाभ मिळाला.

सार्वजनिक विभागाचे काम जास्तीत जास्त लोकाभिमुख पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. या धोरणास धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती व धर्मादाय सह आयुक्त, पुणे विभाग, पुणे श्रीमती रजनी क्षीरसारगर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य लाभत असल्याचे धर्मादाय उपायुक्त प्रविण कुंभोजकर यांनी सांगितले.