सोलापूर विद्यापीठात 'एनएसएस'च्या साखळी शिबिराचे उद्घाटन
सोलापूर : जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करून वाटचाल ठेवावी आणि त्यासोबतच आपल्या कामात सातत्य व परिश्रम आवश्यक असून या बळावर यश शक्य असल्याचे प्रतिपादन हिवरेबाजारचे आदर्श सरपंच पोपटराव पवार यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष श्रमसंस्कार साखळी शिबिराचे उद्घाटन पोपटराव पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी कुलसचिव योगिनी घारे, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक वीरभद्र दंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर हे होते.
प्रारंभी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांनी महिनाभर चालणाऱ्या विशेष श्रमसंस्कार शिबिरातून विद्यापीठाच्या नूतन कॅम्पस परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात येणार असल्याचे सांगितले. यासाठी शहरातील संलग्नित महाविद्यालयातील एनएसएसचे विद्यार्थी टप्प्या-टप्प्याने येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पोपटराव पवार म्हणाले की, सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण भारतभर जलसंवर्धनाचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. घाट, बारवा, मोठ्या विहिरीची निर्मिती त्यांनी केली आहे. वृक्ष लागवडीसाठी शेतकऱ्यांकरिता त्यांनी सुरू केलेल्या सात-बाराचे नाव आजही शेती उताऱ्याला आहे. त्यांच्या कार्याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करायला हवे. विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून जीवनात वाटचाल ठेवावे. अडथळ्यांना व संघर्षाला सामोरे जाऊन आपल्या इच्छाशक्तीद्वारे जीवनात यशस्वी होता येते, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर म्हणाले की, विद्यापीठाच्या नूतन कॅम्पस परिसरात यंदा एक लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केलेला आहे. त्यातील 50 हजारांहून अधिक वृक्ष लावण्यात आली आहेत. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या पुढाकारातून सुरू असलेल्या या वृक्ष लागवडीतून फळांची तसेच विविध औषधी वनस्पतींची झाडे लावण्यात येत आहेत. भविष्यकाळात त्याचा विद्यापीठाला निश्चितच फायदा होणार आहे. एनएसएसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकास घडतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमास विद्यापीठ अधिविभाग, वालचंद अभियांत्रिकी, वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
...फोटो ओळी
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष श्रमसंस्कार साखळी शिबिराचे उद्घाटन आदर्श सरपंच पोपटराव पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, कुलसचिव योगिनी घारे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, जिल्हा समन्वयक वीरभद्र दंडे व अन्य छायाचित्रात दिसत आहेत.