सोलापूर : सोलापुरातील चिंचोळी एमआयडीसी येथील सिमको स्पिनर्स कामगारांच्या प्रश्नांसंबंधी पालकमंत्री व कामगार मंत्री यांच्यासोबत 30 जानेवारी रोजी तातडीची बैठक लाऊन लवकरात लवकर हा प्रश्न सोडवू, असं आश्वासन आमदार देवेंद्र कोठे यांनी बेरोजगार कामगारांना दिले.
सिमको स्पिनर्स सूतगिरणी चिंचोळी एमआयडीसीत 1992 सालापासून व्यवस्थित चालू होती. या गिरणीकडं चिंचोली एमआयडीसीतील पहिला कारखाना म्हणून पाहिलं जात होते, असे असताना कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता ही कंपनी एनसीएलटी न्यायालयाने 2019 साली बंद केली.
तेथे काम केलेल्या गरीब कष्टकरी कामगारांचा फंड, ग्रॅज्युइटी पगार, पगारी रजेचा बोनस इत्यादी मूलभूत हक्कापासून कामगार आजमितीपर्यंत वंचित आहेत. त्यांना त्यांच्या घामाचा दाम मिळावा या मागणीसाठी आमदार देवेंद्र कोठे यांच्या मुरारजी पेठेतील कार्यालयात भेट घेऊन सिमको स्पिनर्स कामगारांच्या देय रक्कमेसंबंधी सह्याद्री कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी बापू चराटे यांच्या नेतृत्वाखाली आमदार कोठे यांना निवेदन देण्यात आले. त्यांना निवेदन दिल्यावर सविस्तर माहिती देण्यात आली.
त्यावर आमदार कोठे यांनी पालकमंत्री आणि कामगार मंत्री समवेत बैठक लाऊन सकारात्मक निर्णय घेण्यासंबंधी सर्व कामगारांना आश्वासित केले. त्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.
यावेळी सह्याद्री कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी बापू चराटे, रवी गुंड, काशिनाथ गुंड, बालाजी कायत, हरी चौरे, आनंद निली कोळी, गोपाळ जाधव, नवले राऊत इत्यादी बहुसंख्य कामगार उपस्थित होते.