Type Here to Get Search Results !

...एकत्र येऊन गाव अन् जिल्हा करावा समृद्ध; भेंड गाव सदिच्छा भेटीत आमदार देशमुख यांचं आवाहन

सोलापूर : आपल्या गावाची ताकद ओळखा, प्रत्येक कुटुंब सक्षम करा, घरा-घरामध्ये स्पर्धा लावा, गावा-गावामध्ये विकासाच्या स्पर्धा लावा, भेंड गावाने पाण्याची पातळी वाढवण्यासाठी अत्यंत चांगले काम केले आहे. गट-तटाचे राजकारण न करता सर्वांनी एकत्रित येत काम करत आपले गाव, जिल्हा समृद्ध करावा, असं आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले.

अटल भुजल योजना जिल्हांतर्गत माढा तालुक्यातील अभ्यास सहल आदर्श गाव भेंड येथे आमदार देशमुख यांनी  सदिच्छा भेट दिली, त्यावेळी आ. देशमुख बोलत होते. यावेळी  माजी समाजकल्याण सभापती शिवाजी कांबळे, माजी जि. प. सदस्य भारत आबा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

भेंड हे जिल्ह्यातील मॉडेल गाव म्हणून पुढे येत आहे. या गावामध्ये लोकसहभागाच्या माध्यमातून पाणी, जलसंधारण, बायोगॅस समृद्ध गाव या विषयावर काम  सुरू करावे. प्रत्येक गावाने स्वतःची ओळख निर्माण करावी व आपले कृषि पर्यटन निर्माण करावे. यामुळे रोजगार निर्मिती होते. जिल्ह्यात धार्मिक पर्यटन स्थळे खूप आहेत, त्याची प्रसिद्धी करा आणि आपल्या गाव एक उत्पादनाने प्रसिद्ध करा, असे आवाहनही आ. देशमुख यांनी केले.

यावेळी सुभाष रणदिवे, कनिष्ठ भूवैनिक डॉ. संजय साबळे, यशदा प्रशिक्षक शिवाजी पवार, कृषीतज्ज्ञ शरद गायकवाड, भेंड गावचे सरपंच डॉ. मनिषा दळवी, माजी सरपंच डॉ. संतोष दळवी, प्रवीण गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील सरपंच व गावचे प्रतिनिधी उपस्थिती होते.