सोलापूर : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम-कुष्ठरुग्ण शोध व उपचार अभियान- 31 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2025 सोलापूर जिल्ह्यात हेकुष्ठरूग्ण शोध व उपचार अभियान राबविण्यात येत आहे. मंगळवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचे अध्यक्षतेखाली समन्वय समितीची सभा हे अभियान सोलापूर जिल्ह्यात राबविण्यासाठी घेण्यात आले.
समाजातील निदान न झालेले कुष्ठरूग्ण लवकरात लवकर शोधून त्वरीत बहुविध औषधोपचारखाली आणणे, नविन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडीत करून होणार प्रसार कमी करणे, समाजात कुष्ठरोगाविषयी जनजागृती करणे, सन 2027 पर्यंत शुन्य कुष्ठरोग प्रसाराचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करण्याकरिता समाजात असलेल्या प्रत्येक संशयित कुष्ठरूग्णांचा शोध पथकामार्फत शोध घेऊन त्याचे निदान निश्चित करणे व निदान झालेल्या कुष्ठरुग्णांना तात्काळ बहुविध औषधोपचार सुरू करण्यासाठी केंद्र कुष्ठरोग अभियान सुरू केले आहे.
हे अभियान 14 दिवसाचे असणार आहे. या अभियानात राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये सोलापूर जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ग्रामीण भागातील सर्व व शहरी भागातील निवडक लोकसंख्येची तपासणी करण्यात येणार आहे. याचबरोबर विविध माध्यमांद्वारे कुष्ठरोगाविषयी शास्त्रीय माहिती समाजात पसरविण्यात येणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील या 14 दिवसाच्या तपासणी अभियानासाठी 36 लाख 57 हजार 590 लोकसंख्येची निवड करण्यात आली असुन 2 हजार 768 शोधपथके तयार करण्यात आली आहेत. या शोध पथकांचे पर्यवेक्षण करण्यासाठी 554 पर्यवेक्षकांची नेमणुक करण्यात आली आहे. शोध पथकाने शोधलेल्या प्रत्येक संशयीताची वैद्यकीय अधिकारी यांचेकडून करुन निदान करण्यात येऊन, जर कुष्ठरोग असेल तर तात्काळ बहुविध औषधोपचार सुरु करण्यात येणार आहे. या अभियान दरम्यान तपासणी करण्याकरीता येणाऱ्या पथकाकडून तपासणी करुन घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले.
या सभेस सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग), सोलापूर डॉ. मोहन शेगर, यांनी सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे दिली. या सभेस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, आरोग्य अधिकारी, डॉ. राखी माने, मुख्य महानगरपालिका सोलापूर, डॉ. नंदकिशोर घाडगे, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. मिनाक्षी बनसोडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ. आनंद गोडसे, वैद्यकीय अधिकारी कुष्ठरोग विभाग, डॉ. एस.पी. कुलकर्णी, निवासी वैद्यकीय अधिकारी, उमेश साने, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, श्रीमती वैशाली थोरात, जिल्हा लेखा व्यवस्थापक, श्रीमती वंदना शिंदे, जिल्हा आशा समन्वयक यासह आरोग्य सेवेतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.