Type Here to Get Search Results !

पोलीस आयुक्तालय हद्दीत मनाई आदेश लागू

सोलापूर :   सोलापूर शहरात (पोलीस आयुक्तालय हद्द)  सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून आज बुधवारी, 29 जानेवारी 00.01 वाजलेपासून ते 12 फेब्रुवारी रात्री 24.00 वाजेपर्यंत  या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) व 37 (3) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आलेले आहेत. पोलीस उपायुक्त, (शहर) डॉ. दिपाली काळे यांनी यासंबंधीचे आदेश जारी केलेत.

सोलापूर शहर (पोलीस आयुक्तालय हद्दी मध्ये)  धार्मिक सण, उत्सव ,जयंती, पुण्यतिथी  साजरे करणारे शहर आहे. शहरात छोट्या-मोठ्या कारणावरुन संप आंदोलने, निदर्शने होत असतात. तसेच शहरात आगामी काळात महात्मा गांधी पुण्यतिथी, श्री गणेश जयंती, माघीवारी , संत रोहिदास जयंती, आदी सण आहेत, तसेच बीड सरपंच खून प्रकरणावरून राज्यात आंदोलने सुरू आहेत. शिवाय मराठा, ओबीसी व धनगर आरक्षण आदी माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, भाले, सुरे, झेंडा लावलेली काठी किंवा शरीरास ईजा करण्याकरीता वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही ज्वालाग्राही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड किंवा फेकावयाची उपकरणे, व्यक्ती अगर त्यांची प्रेत यात्रा, प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक घोषणा करणे, असभ्य हावभाव करणे, ग्राम्य भाषा वापरणे, सभ्यता अगर निती  विरुध्द निरनिराळ्या जाती जमातीच्या भावना दुखावल्या जातील, त्यामुळे त्यांच्यात भांडणे बखेडे निर्माण होऊन शांततेस बाधा होईल, तसेच 5 किंवा 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई, सोंगे अगर चिन्हे कोणताही जिन्नस तयार करुन त्याचा प्रसार करण्यास मनाई करण्यात येत आहे.

हा आदेश सक्षम पोलीस प्राधिकरणाची पुर्वपरवानगी घेतलेल्या मिरवणूका, मोर्चे, रॅली,आंदोलने निवेदने, धरणे सभा यांना वगळून तसेच अंत्ययात्रा व अत्यावश्यक सेवा, तसेच सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये अधिकार बजाविताना उपरनिर्दीष्ठ वस्तू हाताळाव्या लागतात आणि ज्या व्यक्तींना जिल्हादंडाधिकारी, पोलीस अधीक्षक (ग्रा.), उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, दुय्यम पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या परवानगीस लागू होणार नाहीत, असंही सुचित करण्यात आलंय.