शनिवारी पाशा पटेल यांच्या उपस्थितीत होणार वितरण
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. उत्तर सोलापूर सरपंच समितीच्या सहकार्याने यंदाचा हा पुरस्कार सोहळा होणार आहे. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या हस्ते शनिवारी (ता. १८) डॅा. निर्मलकुमार फडकुले सभागृहात सकाळी अकरा वाजता या पुरस्कारांचे वितरण होणार आहे, अशी माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गायकवाड आणि सरपंच समितीचे अध्यक्ष उमेश भगत यांनी दिली.
दरवर्षी उत्तर सोलापूर पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी आमदार दिलीप माने यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होईल. याप्रसंगी तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
यंदाच्या पुरस्कारामध्ये अकोलेकाटी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका सरस्वती पवार (शिक्षण), पाकणी येथील प्रगतीशील शेतकरी डॉ. किशोर शिंदे (कृषी), पाणी फाउंडेशनचे समन्वयक अतिश शिरगिरे (सामाजिक), नळजोडणी करणाऱ्या कविता शिंदे (महिला) तर कोंडी येथील वीट उद्योजक वामन भोसले (उद्योग) अशा विविध क्षेत्रातील पाच जणांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
यावर्षीचा आदर्श पत्रकार पुरस्कार दैनिक `पुढारी` चे प्रतिनिधी विजय थोरात (सोलापूर) यांना जाहीर झाला आहे. या सोहळ्यात तालुक्यातील विशेष गुणीजनांचाही यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला तालुकावासियांनी उपस्थित रहावे, असं आवाहन संदीप गायकवाड आणि उमेश भगत यांनी केलं आहे.