मोहोळ : मोहोळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला पोलीस ठाण्याकडील फसवणूक व घरफोडीचे २ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आलंय. डी.बी. पथकाने कौशल्यपूर्ण तपास आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे २ आरोपींना गजाआड केलंय. उभयतांच्या ताब्यातून जवळपास पाऊणे चार लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.
यासंबंधी मिळालेली अधिक माहिती अशी की, मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथील रंजना अशोक खांडेकर या महिलेस अज्ञातांनी तिच्या गळ्यातील मंगळसूत्राच्या बदल्यात जास्तीचे सोने देण्याच्या आमिषाने अर्धा तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र काढून घटनास्थळावरून काढता पाय घेतला होता. ही घटना मोहोळ शहरातील पाटील हॉस्पिटलजवळ 05 जानेवारी रोजी घडली.
याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार मोहोळ पोलीस ठाण्यात बी.एन.एस. कलम ३१८(४) प्रमाणे अज्ञात इसमांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोहेकॉ दयानंद हेंबाडे यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आलेला होता. या गुन्ह्याच्या तपासात डी.बी. पथकातील अंमलदारांनी सीसीटीव्ही फुटेज पाहणी, गोपनीय खबऱ्यांकडून मिळालेली महत्वपूर्ण माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अभिमान बापू तुपे (रा.पिटी, ता. पाटोदा, जि.बीड) याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले.
त्याच्या ताब्यातून फसवणुकीच्या गुन्ह्यात गेलेले अर्धा तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले. त्याची बाजार मूल्याप्रमाणे किंमत सुमारे ३० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. या गुन्ह्यात करून अभिमान तुपे याला अटक करून कसून तपास करता, त्याच्याकडून अन्य अनोळखी आरोपींची नावं निष्पन्न करण्यात यश आलंय.
मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे आष्टी येथील संगीता दत्तात्रय माने यांच्या घरात कोणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी कपाटातील लॉकर तोडून साडे तीन लाख रुपये चोरून नेले. हा प्रकार मकर संक्रांतीच्या अगोदर, १३ जानेवारी रोजी घडला. याप्रकरणी दाखल तक्रारीनुसार मोहोळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१(३) प्रमाणे अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याचा तपास पोहेकॉ/दयानंद हेंबाडे यांच्याकडे सोपविण्यात आलेला होता.
या गुन्ह्याच्या तपासात डीबी पथकातील पथकातील अंमलदार यांनी घटनास्थळाची पाहणी करून गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल माहीती घेऊन तसेच गोपनीय माहीतीदार यांच्याकडून माहीती घेऊन तसेच तांत्रिक विश्लेषणाचे अवलोकन करून संशयीत आरोपी धिरज कैलास गुंड (रा. आष्टी) यास ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्याच्याकडे कौशल्याने कसून चौकशी केली, त्यात त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. या घरफोडीच्या गुन्ह्यात चोरीस गेलेल्या साडे तीन लाख रूपयांपैकी ३,४५,००० रूपयांची रोकड जप्त करून हा गुन्हा उघकीस आणला आहे. डीबी पथकाने फसवणूक आणि घरफोडीच्या गुन्ह्यात ३, ७५, ००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.
ही उल्लेखनिय कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी (सोलापूर ग्रामीण), अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर (सोलापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक हेमंत शेडगे, पोलीस उपनिरिक्षक अजय केसरकर, डी. बी. पथकातील पोहेकॉ/दयानंद हेंबाडे, पोहेकॉ/संदेश पवार, पोना/चंद्रकांत ढवळे, पोकॉ/अमोल जगताप, संदीप सावंत, अविराज राठोड, स्वप्नील कुबेर, सुनिल पवार, पोहेकॉ/पठाडे व सायबरकडील युसूफ पठाण यांनी बजावलीय.